नागपुरात तांदळातील किटकनाशक गोळीने घेतला बळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:19 AM2018-06-01T01:19:09+5:302018-06-01T01:19:29+5:30
अनवधानाने विषारी गोळी खाण्यात गेल्यामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनवधानाने विषारी गोळी खाण्यात गेल्यामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी ही घटना घडली.
अभिषेक शंकर तराडे (वय १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. नववीचा विद्यार्थी असलेल्या अभिषेकची बुधवारी दुपारी अचानक प्रकृती ढासळली. त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला उपचाराकरिता मेडिकलमध्ये भरती केले. उपचारादरम्यान ९.४५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून नंदनवन पोसिलांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अभिषेकला विषबाधा कशी झाली त्याची पोलिसांनी चौकशी केली असता पुढे आलेली माहिती अशी, तांदळाला कीड लागू नये म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी विषारी गोळ्या तांदळात भरून ठेवल्या होत्या. चुकीने ती गोळी अभिषेकच्या खाण्यात आली अन् हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.