शाळांतील खिचडी बंद पडण्याच्या वाटेवर; डिसेंबरनंतर तांदूळ मिळालाच नाही

By गणेश हुड | Published: February 28, 2023 07:43 PM2023-02-28T19:43:20+5:302023-02-28T19:43:38+5:30

नागपूरमधील अनुदानित शाळांमधील शालेय पोषण आहाराचा तादूळ पुरवठा मागील तीन महिन्यापासून बंद आहे. 

 Rice supply of school nutrition food in aided schools in Nagpur has been stopped since last three months   |  शाळांतील खिचडी बंद पडण्याच्या वाटेवर; डिसेंबरनंतर तांदूळ मिळालाच नाही

 शाळांतील खिचडी बंद पडण्याच्या वाटेवर; डिसेंबरनंतर तांदूळ मिळालाच नाही

googlenewsNext

नागपूर: जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमधील शालेय पोषण आहाराचा तादूळ पुरवठा मागील तीन महिन्यापासून बंद आहे. आधिच्या शिल्लक साठ्यातून खिचडी दिली जात आहे. जुना साठा संपल्याने ८ शाळांमध्ये खिचडी शिजली नाही. आठवडाभरात मार्च महिन्यासाठी तांदूळ मिळाला नाही तर शाळांतील खिचडी वाटप बंद पडणार असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ निःशुल्क देण्यात येतो. पण सरकारने शाळांना तांदुळाचा पुरवठा करण्यासाठी पुरवठादार नियुक्त केला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

वर्ग पहिला ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना आहे. नागपूर जिल्हयातील २७४८ शाळांतील ३ लाख १३ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. यात जिल्हा परिषद,खासगी अनुदानित, महापालिकेच्या शाळांचा समावेश आहे. एक ते पाच वर्गांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० ग्राम तांदूळ दिला जातो. तर वर्ग सहा ते आठपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५० ग्राम तांदूळ दिला जातो. मात्र मार्च महिन्यासाठी फेब्रुवारी महिन्यात तांदुळाचा पुरवठाच झालेला नाही. जुना साठा संपत आला आहे. साठा संपल्याने आठ शाळांतील विद्यार्थ्यांना खिचडी मिळालेली नाही. जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार विभागातील अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
 
तेल, मिळाचे पैसे लवकर मिळत नाही
२० ग्राम डाळ व इतर पोषण आहारामधील बिस्कीट, राजगिऱ्याचे लाडू, हळद, मीठ, तिखट, भाजीपाला व इंधन खर्च शाळा व्यवस्थापनाला करावा लागतो. हा पैसा तीन- चार महिने मिळत नाही. पैसे वेळेवर मिळत नसल्याने महिला बचत गटांनी खिचडी वाटपाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना स्वत:हा खर्च करावा लागतो. शासनाकडून हा निधी कधी मिळेल याची तारीख ठरलेली नाही.
 
डिसेंबर नंतर तांदूळ मिळाला नाही
जानेवारी महिन्यासाठी डिसेंबर महिन्यात तांदूळ मिळाला होता. त्यानंतर मिळालेला नाही. नवीन निविदा काढण्यात आल्या नसल्याचे गेल्या महिनाभरापासून पोषण आहारवाटप विस्कळीत झाले आहे. सध्या शिल्लक साठ्यातून खिचडी वाटप सुरू आहे


 

Web Title:  Rice supply of school nutrition food in aided schools in Nagpur has been stopped since last three months  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर