तांदळाच्या दादाची राजकीय दादांकडून अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:57+5:302021-06-17T04:06:57+5:30
केवळ दीड एकर मालकीची जमीन असलेल्या स्व. दादाजी खोब्रागडे यांनी तांदळाचे नऊ वाण विकसित केले. त्याच वाणाच्या भरवशावर पाच ...
केवळ दीड एकर मालकीची जमीन असलेल्या स्व. दादाजी खोब्रागडे यांनी तांदळाचे नऊ वाण विकसित केले. त्याच वाणाच्या भरवशावर पाच राज्यातील लाखो हेक्टर जमिनीवर शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या या कार्याची दखल राजकीय नेत्यांना कधीच घेता आली नाही. दखल घेतली ती केवळ त्यांच्या निधनानंतर सांत्वना देण्यासाठी. त्याचवेळी या राजकीय दादांनी सच्च्या दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मारक उभारण्याची व त्यांना पद्मपुरस्कार देण्याची घोषणा केली. दिवस गेला, वेळ गेली आणि दादा त्यांच्या विस्मृतीसही गेले. तुरुंगात असलेल्या राजकीय नेत्यांवर लाखोचा खर्च करणारे सरकार, पक्षाघात झाला तेव्हा दादांवरील उपचारासाठी कधीच सरसावले नाही. सरकारी व्यवस्थेने जगाच्या या पोशिंद्याला वाऱ्यावर सोडले. महाराष्ट्र शासनाने त्यांना २००६ मध्ये कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित केले होते. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे जेव्हा शासनाने पुरस्कारादाखल दिलेले सुवर्णपदक विकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते सुद्धा पितळेचे निघाले. याच महिन्यात ३ जून रोजी त्यांचा तिसरा स्मृतिदिन होता. मात्र, तांदळाच्या वाणाचा आविष्कार करणाऱ्या या थोर संशोधकाबाबत शासनालाही विसर पडलेला आहे.
- डॉ. प्रकाश घवघवे, संचालक : लोकविद्यापीठ