गरिबांच्या ‘आरटीई’त श्रीमंत पालक
By admin | Published: April 14, 2015 02:23 AM2015-04-14T02:23:55+5:302015-04-14T02:23:55+5:30
सोमवारी दीक्षाभूमी स्थित बी.आर.ए.मुंडले शाळेच्या सभागृहात ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेअंतर्गत ‘ड्रॉ’ काढण्यात आले.
प्रवेशाचे निघाले ‘ड्रॉ’ : चार दिवसांनी कळणार ‘एसएमएस’वर माहिती
नागपूर : सोमवारी दीक्षाभूमी स्थित बी.आर.ए.मुंडले शाळेच्या सभागृहात ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेअंतर्गत ‘ड्रॉ’ काढण्यात आले. नियमांनुसार वंचित व दुर्बल कुटुंबातील मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी ‘आरटीई’ची (राईट टू एज्युकेशन) प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्ष ‘ड्रॉ’च्या वेळी आलेल्या अनेक पालकांकडे महागड्या दुचाक्या व ‘स्मार्टफोन’ दिसून येत येत होते. अशा स्थितीत ‘आरटीई’चे प्रवेश नेमके कुणासाठी आहेत असा प्रश्न उपस्थित होत होता.
शिक्षण विभागाकडून सकाळी ११ वाजता ‘आॅनलाईन’ प्रणालीने ‘ड्रॉ’ काढण्यात आला. ‘एनआयसी’ पुणे यांच्या ‘सॉफ्टवेअर’च्या मदतीने ही प्रक्रिया पार पाडली. यावेळी नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चव्हाण, नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती चेतना टांक, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर चौधरी, आरटीई अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष शाहीद शरीफ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ‘ड्रॉ’करता ४ ‘बाऊल’मध्ये ० ते ९ अशा १० चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. या चिठ्ठ्या बालकांकडून काढण्यात आल्या व त्यांची संगणकीय नोंद करण्यात आली. याचे ‘मॅट्रिक्स’ पूर्ण झाल्यानंतर ‘ड्रॉ’ अंतिम झाला. मुलांना नेमक्या कुठल्या शाळेत प्रवेश मिळाला आहे याची माहिती चार दिवसांनी ‘एसएमएस’वर कळविण्यात येईल असे यावेळी शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
गरिबांच्या प्रक्रियेत सधन उमेदवार पाहून अगोदरच अनेक पालक संतप्त झाले होते. अशा स्थितीत माहिती चार दिवसांनी ‘एसएमएस’वर मिळणार असल्याचे कळताच पालकांचा पारा आणखी चढला व अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
या ‘ड्रॉ’ची माहिती इतक्या उशिरा का देण्यात येत आहे, माहिती सार्वजनिक का करण्यात येत नाही याबाबत विचारणा करण्यात आली. सर्व प्रक्रिया ‘आॅनलाईन’ असल्याने यात कुठलाही गोंधळ होणार नाही व पूर्णपणे पारदर्शकता राहील असे पालकांना समजावून सांगितले.
येथे सधन पालक कसे काय आले याबाबत पालकांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली असता याबाबत ठोस उत्तर कोणीही देऊ शकले नाही. पालकांना उत्पन्नाचे दाखले उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार यांच्याकडून देण्यात आले. त्यांच्या दाखल्यांवर आक्षेप घेण्याचा आम्हाला अधिकार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)