फेरीवाल्यांना मिळणार हक्काची जागा
By admin | Published: April 19, 2015 02:24 AM2015-04-19T02:24:29+5:302015-04-19T02:24:29+5:30
उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने स्वयंरोजगार करणाऱ्या फेरीवाल्यांना पोलीस, महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक यांच्या कारवाईला सामोरे जावे लागते.
नागपूर : उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने स्वयंरोजगार करणाऱ्या फेरीवाल्यांना पोलीस, महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक यांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. परंतु केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व राज्य सरकारच्या नागरी उपजीविका अभियानांतर्गत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यात फेरीवाल्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. याबाबतचे धोरण निश्चित करण्यासाठी मनपा समिती गठित करणार आहे.
या समितीच्या शिफारशीनुसार फेरीवाल्यांना जागा दिल्या जाणार आहे. हा प्रस्ताव सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. याबाबतच धोरण निश्चित करताना मनपाने पोलीस विभाग, शहर आराखडा नियोजन प्राधिकरण व इतर स्थानिक विभागाशी समन्वय साधून आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्थापन, शहरातील बाजारपेठांचे दिवस, आठवडी बाजार, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह इत्यादी बाबींचा यात समावेश केला जाणार आहे. फेरीवाला क्षेत्र सर्वसाधारणपणे बाजारपेठा, कार्यालये, निवासी क्षेत्र व इतर सार्वजनिक ठिकाणी असणे अभिप्रेत आहे. फेरीवाला धोरण निश्चित करताना यापूर्वी असलेल्या बाजारपेठांजवळ फेरीवाला क्षेत्राचे नियोजन करण्यात यावे. (प्रतिनिधी)