अवैध दारू बंद करण्याचे ग्राम रक्षक दलाला अधिकार

By admin | Published: April 25, 2017 01:43 AM2017-04-25T01:43:27+5:302017-04-25T01:43:27+5:30

गावातील अवैध दारू बंद करण्याचे अधिकार ग्राम रक्षक दलाला असेल, असे ज्येष्ठ समाजसेवी अण्णा हजारे यांनी सांगितले आहे.

The right to the village guard broker to stop illegal liquor | अवैध दारू बंद करण्याचे ग्राम रक्षक दलाला अधिकार

अवैध दारू बंद करण्याचे ग्राम रक्षक दलाला अधिकार

Next

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे : सरकारचे केले कौतुक
नागपूर : गावातील अवैध दारू बंद करण्याचे अधिकार ग्राम रक्षक दलाला असेल, असे ज्येष्ठ समाजसेवी अण्णा हजारे यांनी सांगितले आहे. गावात अवैध दारूभट्टी एवढाच अवैध दारूचा अर्थ नसून विना परवान्याची दारूनिर्मिती, दारूची विक्री, विना परवान्याची दारू बाळगणे यासारख्या सर्व बाबी अवैध दारूमध्ये येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सदर कायदा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहसचिव सुधीर श्रीवास्तव व राज्य उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा यांनी जनहितासाठी परिश्रम घेतले म्हणून हा कायदा होऊ शकला, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अण्णा हजारे यांनी सांगितले की, ज्या गावतील लोक एकत्र येऊन ग्रामसभेमध्ये ठराव करतील की आम्ही आमच्या गावातील अवैध दारू बंद करण्यासाठी ग्राम रक्षक दल स्थापन करण्यास तयार आहोत तरी आमच्या ग्राम रक्षक दलाला कायद्यानुसार मान्यता देण्यात यावी.
अशा गावांमध्ये ग्राम रक्षक दल तयार केले जातील. गावामध्ये ग्रामपंचायतची सदस्यसंख्या जेवढी असेल तेवढीच संख्या ग्राम रक्षक दलाची असेल. तसेच ज्या गावातील २५ टक्के महिला ग्रामसभा घेऊन ठराव करीत असतील की आमच्या गावात ग्राम रक्षक दल करण्यात यावे किंवा ग्रामपंचायतने बोलावलेल्या ग्रामसभेमध्ये ५० टक्के लोकांनी ठरविले की, आमच्या गावात ग्राम रक्षक दल स्थापन करण्यात यावे, तर तसा अर्ज उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे जाईल.
उपविभागीय दंडाधिकारी तहसीलदारांना कळवतील व त्यानंतर तहसीलदार ग्राम रक्षक दल निवडीसाठी दिनांक, वार व वेळ निश्चित करून विशेष ग्रामसभा बोलावतील. सदर ग्रामसभेचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाईल. तो ग्रामसभेचा पुरावा असेल. ग्रामसभा ग्राम रक्षक दलामध्ये कोण सदस्य असावेत, त्यांची नावे सुचवतील. ग्राम रक्षक दलामध्ये ३३ टक्के महिला असतील. त्याचप्रमाणे मागासवर्गीय, आदिवासी आणि इतर समाजालाही गावातील संख्येप्रमाणे प्राधान्य देण्यात येईल.(प्रतिनिधी)

तर संबंधित हॉटेलचाही परवाना रद्द
एखाद्या हॉटेलमध्ये विना परवान्याची दारू विकली जाते, या संबंधाने ग्रामरक्षक दलाने पोलीस निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याला कळविल्यानंतर त्यांनी त्या हॉटेल मालकांवर कार्यवाही करायची आहे. अशा हॉटेल मालकावर दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस खाते आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याने हॉटेल परवाना रद्द करण्याबाबत संबंधित खात्याला कळवायचे आहे. संबंधित खात्याने त्या हॉटेलचा परवाना रद्द करावयाचा आहे.

महिलांची छेड काढल्यास
७ ते १० वर्षांपर्यंत शिक्षा
दारू पिऊन महिलांची छेडछाड केली तर अशा गुन्हेगाराला सात वर्षे ते दहा वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि पाच लाखापर्यंत दंडाची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच पूर्वी दारूबंदीसाठी महिलांचे मतदान करताना वेळ सकाळी ८ ते दुपारी २ अशी होती आता ती वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ अशी करण्यात आली आहे.

१२ तासाच्या आत गुन्हा दाखल अन्यथा शिस्तभंगाची कार्यवाही
ग्राम रक्षक दलाच्या दोन किंवा तीन सदस्यांनी लेखी पत्राद्वारे तालुका पोलीस निरीक्षकास आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना अवैध दारूबाबत तक्रार केल्यास १२ तासाच्या आत पोलीस निरीक्षक किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस उपनिरीक्षकांनी येऊन दारूभट्टीवर धाड टाकतील व गुन्हा दाखल करतील. १२ तासाच्या आत गुन्हा दाखल न झाल्यास पोलीस निरीक्षकास आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यास कर्तव्यामध्ये कसूर केल्यामुळे शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल.

Web Title: The right to the village guard broker to stop illegal liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.