‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ने सखी मंत्रमुग्ध
By admin | Published: July 30, 2016 02:40 AM2016-07-30T02:40:43+5:302016-07-30T02:40:43+5:30
बाहेर ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी, आनंददायी हवामान आणि सभागृहात ओसंडून वाहणारा सखींचा उत्साह.
पावसाचे गीत व नृत्याच्या तालावर थिरकले सभागृह : कलर्स व लोकमत सखी मंचचे आयोजन
नागपूर : बाहेर ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी, आनंददायी हवामान आणि सभागृहात ओसंडून वाहणारा सखींचा उत्साह. प्रत्येक पावसाच्या गाण्यावर एकच जल्लोष. युवती, महिला, पुरुष सारेच चिंबचिंब. नृत्याच्या तालावर तर अख्खे सभागृहच थिरकले. असा हा अविस्मरणीय दिवस आणि रंगलेल्या गाण्याचा कार्यक्रम. निमित्त होते, कलर्स व लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजित ‘रिमझिम गाणी-झलक सुहानी’ कार्यक्रमाचे.
शंकरनगर येथील साई सभागृहात बुधवारी हा कार्यक्रम सखींच्या भरगच्च गर्दीत बहरला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला घेऊन नागपूरकरांमध्ये मोठी उत्सुकता होती. परिणामी, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण सभागृह फुल्ल झाले होते. यामुळे अनेक रसिकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून कार्यक्रमाचा आनंद लुटला. ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ या खास पावसावर आधारीत गीतांचा कार्यक्रम सुरू झाला. हिंदी-मराठी अशा एकाहून एक सरस गाणी सादर करण्यात आली. प्रत्येक गाण्याला सखींची दिलखुलास दाद हे वैशिष्ट्य ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या भक्तिगीताने झाली. नागपूरची गुणी आणि सुरेख गायिका अंकिता टकले हिच्या गोड आवाजात ‘सूर निरागस हो’ या गीताने प्रचंड टाळ्या घेतल्या. नंतर प्रसिद्ध गायक आणि ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आपल्या नावावर केलेले सुनील वाघमारे यांच्या ‘आज मौसम बडा बेईमान है बडा’ या गीताने वातावरण प्रसन्न झाले.
सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी गायलेले ‘रिमझिम गिरे सावन...’ या गीताला प्रसिद्ध गायक सागर मधुमटके यांनी त्याच अंदाजात सादर करून कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवले. आकांक्षा नगरकर यांनी ‘ओ सजना बरखा बहार आई...’ गीत सादर करून ६० च्या दशकातील रसिकांच्या सोनेरी आठवणी ताज्या केल्या. आकांक्षा आणि श्रीकांत टकले यांनी सादर केलेल्या ‘चिंब भिजलेले’ या मराठी गीताला टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.
गीतांच्या या प्रवासात गायक कलावंतांनी एकाहून एक गीत सादर करीत रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. कार्यक्रमाची संकल्पना हार्माेनी इव्हेंन्टचे राजेश समर्थ यांची होती तर वादकांमध्ये नंदू गोहाने, राजा राठोड आणि पंकज यादव यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाला ट्रीट आईस्क्रीमचे संचालक अमोल चकनलवार व मंजूषा चकनलवार प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन नेहा जोशी यांनी केले.(प्रतिनिधी)