रि ंग रोड बनला ‘अॅक्सिडेंट स्पॉट’
By Admin | Published: February 27, 2015 02:17 AM2015-02-27T02:17:49+5:302015-02-27T02:17:49+5:30
यशोधरानगर येथील रिंग रोडवरून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक सुरू असते. मुख्यत: कामठी रोडकडून कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मुख्य रिंग रोडवर वाहतुकीची वर्दळ असते.
यशोधरानगर : यशोधरानगर येथील रिंग रोडवरून मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक सुरू असते. मुख्यत: कामठी रोडकडून कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मुख्य रिंग रोडवर वाहतुकीची वर्दळ असते. येथील चौकात वाहतूक सिग्नल नसल्याने वाहतुकीची कोंडी ही रोजचीच बाब झाली असून हा परिसर
‘अॅक्सिडेंट पॉर्इंट’ बनला आहे.
यशोधरानगर रिंग रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत. कामठी रोड व यादवनगरकडून यशोधरानगरकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. यातच कळमना मार्केट व कामठीकडे जाणाऱ्या जड वाहनांचे प्रमाण मोठे आहे. अमरावती व काटोल रोडकडे जाणारी जड वाहनेसुद्धा याच मार्गाने जातात. वाहतूक सिग्नल नसल्याने जड वाहने भरधाव वेगाने धावतात.
यातच कामठी रोड ते यशोधरानगर रोडपर्यंत ट्रक, डोझर आदी जड वाहने रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत. विशेषत: यशोधरनगर पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रिंग रोडवर वाहतूक सिग्नल नसल्याने या ठिकाणाला अपघात स्थळ म्हणून ओळखले जात आहे.
रिंग रोडवरून परिसरातील नागरिकांसह दररोज मोठ्या प्रमाणावर शाळकरी मुले ये-जा करतात तेव्हा या ठिकाणी वाहतूक सिग्नल लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
मलेरियाचा मोठ्या प्रमाणात प्रकोप
मनीषनगर भागात मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण झाल्या आहेत. परंतु सुविधांच्या नावावर मात्र बोंब आहे. सर्वत्र रस्ते नाहीत. असलेल्या रस्त्यांचे बेहाल झाले आहेत. सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण आहे. परिसरात डासांचे प्रमाण वाढले परिणामी मलेरियाचा प्रकोप वाढला आहे. मनीषनगर सोबतच टोली, रामटेकेनगर, फुलवतीनगर, लोहारसमाज भवन परिसर आदी भागातही डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून आजाराची शक्यता वाढली आहे.
घाणीचे साम्राज्य वाढले
इतवारी रेल्वे स्टेशनसमोर दहीबाजार परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या बाजारात बाहेरगावचे शेतकरी आपला हिरवा भाजीपाला विकण्यासाठी आणतात. शहरातील मोठ्या बाजारांपैकी हा एक बाजार आहे. बाजार समितीमध्ये शौचालय आहे. परंतु त्याच्या साफसफाईकडे कधीच लक्ष दिले गेले नाही. परिणामी सर्वत्रच दुर्गंधी असते. बाजार परिसरात असलेल्या अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढून आजाराची शक्यता बळावली आहे. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या बाजारातील स्वच्छतकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी केली आहे.
समस्यांच्या पूर्ततेसाठी महिला सरसावल्या
बजाजनगर भागात बऱ्याच ठिकाणी घरासमोरील फुटपाथ मोडकळीस आले आहेत. तसेच जानेवारी महिन्यात प्रशासनाद्वारे पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याकरिता जे खोदकाम करण्यात आले, त्याचे महिना उलटूनही सिमेंटीक रण करण्यात आले नाही. त्यामुळे दुचाकी चालक, ज्येष्ठ नागरिक व बालकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. तसेच परिसर अस्वच्छ व असुरक्षित राहतो. यासंबंधात गोविंद प्रधान मार्ग बजाजनगर येथील महिलांनी एकत्र येऊन झोन सभापती गोपाल बोहरे यांना समस्या निवारण्यासाठी निवेदन सादर केले. यात किरण गुप्ता, भूमिका सुटे, वैशाली पुडके, सुंदरी परवरकर आदी महिलांचा सहभाग होता.