देशाला जोडणारा नागपुरातील रिंगरोड धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:59 PM2017-11-17T14:59:35+5:302017-11-17T15:07:25+5:30
प्रशासनाकडून अपघातमुक्त शहरासंदर्भात विविध योजना राबवित येत असल्या तरी उपराजधानीत २०१७ मध्येदेखील अपघातांचे सत्र सुरूच आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात ९०० हून अधिक अपघात झाले.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : प्रशासनाकडून अपघातमुक्त शहरासंदर्भात विविध योजना राबवित येत असल्या तरी उपराजधानीत २०१७ मध्येदेखील अपघातांचे सत्र सुरूच आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत शहरात ९०० हून अधिक अपघात झाले. यातील १८ टक्के अपघात प्राणांतिक ठरले. काही विशिष्ट मार्गांवर अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे पोलीस विभागाला आढळून आले आहे. रिंगरोड हा शहरातील अपघातमार्ग ठरत असून सर्वाधिक अपघात येथेच झाले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१७ ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत शहरात किती अपघात झाले, यातील किती अपघात प्राणांतिक होते, शहरातून जाणाºया राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर किती अपघात झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. जनमाहिती अधिकाºयांकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत शहरात एकूण ९०२ अपघात झाले. यातील सर्वाधिक ९० अपघात रिंगरोडवर झाले. त्याखालोखात अमरावती मार्गावर ६१ तर जबलपूर मार्ग व वर्धा मार्ग येथे प्रत्येकी ६० अपघातांची नोंद झाली. शहरात ९ महिन्यांमध्ये १६३ अपघात हे प्राणांतिक ठरले, तर ३४३ अपघात हे गंभीर स्वरूपाचे होते. शहरातील अनेक मार्गांवर विकासकामे सुरू आहेत. रिंग रोडवरील नवीन रस्त्यांच्या बांधकामाची गती संथ असल्यामुळे वाहतुकीला त्याचा फटका बसत आहे.
आॅटोचालकांना ६० लाखांचा दंड
४दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये आॅटोचालकांकडून बेशिस्त पद्धतीने पार्किंग करण्यात येते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व अपघाताची शक्यता वाढते. वाहतूक पोलिसांनी सप्टेंबरपर्यंत २६३२९ आॅटोंवर वाहतुकीला अडथळा आणल्याबद्दल कारवाई केली. आॅटोचालकांकडून ६० लाख ६३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.