प्र-कुलगुरूंच्या फाईल्सवर उंदीरमामांचा डोळा
By admin | Published: July 1, 2016 02:59 AM2016-07-01T02:59:23+5:302016-07-01T02:59:23+5:30
कुठल्याही विद्यापीठाचे प्र-कुलगुरूचे पद म्हटले म्हणजे दररोज विविध आव्हानांना सामोरे जाणे आलेच.
नागपूर : कुठल्याही विद्यापीठाचे प्र-कुलगुरूचे पद म्हटले म्हणजे दररोज विविध आव्हानांना सामोरे जाणे आलेच. कधी विद्यार्थ्यांचा मोर्चा, कधी परीक्षा विभागातील अडचणी, तर कधी अंतर्गत राजकारण पिच्छा असतेच. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंना इतर बाबींसोबतच चिंता आहे ती त्यांच्या कक्षातील फाईल्सची. या फाईल्सवर कुणी विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी नव्हे तर चक्क उंदरांचा डोळा आहे. या कक्षात उंदरांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून येथे येणारे पाहुणे अनेकदा हा प्र-कुलगुरूंचा कक्ष आहे की उंदरांचा, असा गमतीत प्रश्न विचारतात.
विद्यापीठाच्या परीक्षांची जबाबदारी सांभाळणारे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या कक्षात उंदीर व घुशींचे साम्राज्य आहे. गंभीर विषयावर एखादी बैठक सुरू असताना किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेत असताना पायाखाली धुमाकूळ घालणाऱ्या उंदरांचा त्यांना दररोज सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
डॉ. प्रमोद येवले यांचा कक्ष ‘हेरिटेज’ दर्जा असलेल्या इमारतीत आहे. हा कक्ष बराच जुना असून नियमांमुळे त्यात फारसे बदल करणे शक्य नाही. वर्षभराअगोदर ते रुजू झाल्यानंतर थोडीबहुत डागडुजी करण्यात आली होती. परंतु येथे अगोदरपासूनच उंदीर, घुशींचे वास्तव्य आहे.
प्र-कुलगुरू कक्षात असतानादेखील उंदीर-घुशी न घाबरता कक्षात मुक्तसंचार करताना दिसून येतात. त्यांच्या कक्षात परीक्षा विभागातील महत्त्वाची कागदपत्रे, पीएचडी उमेदवारांच्या फाईल्स, गोपनीय दस्तऐवज असतात. उंदरांकडून त्या कधीही कुरतडल्या जाण्याची भीती आहे. अनेकदा तर हे उंदीर प्र-कुलगुरू व त्यांच्या कक्षात आलेल्या पाहुण्यांच्या पायावरूनदेखील जातात. (प्रतिनिधी)
नवीन कक्षाची युद्धस्तरावर निर्मिती
उंदरांमुळे त्रास होतोच. परंतु फाईल्स सांभाळून ठेवण्याकडे आमचा भर असतो. संबंधित कक्ष बदलून नवीन कक्ष देण्यात यावा, अशी विनंती प्रशासनाकडे केली असल्याची माहिती प्र-कुलगुरूंनी दिली. विद्यापीठाच्या मुख्य कक्षात प्र-कुलगुरूंच्या नवीन कक्षाचे बांधकाम सुरू आहे. हा कक्ष लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी युद्धस्तरावर काम करण्यात येत आहे. लवकरच हा कक्ष तयार होईल, असे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी सांगितले.