ती हुल्लडबाजी मेट्रोच्या बदनामीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:19+5:302021-01-25T04:08:19+5:30
नागपूर : सेलिब्रेशन ऑन व्हिल्स उपक्रमात वाढदिवसाच्या नावाखाली मेट्रो रेल्वे बुक करून त्यात हुल्लडबाजी करणे आणि जुगार खेळण्याचा प्रकार ...
नागपूर : सेलिब्रेशन ऑन व्हिल्स उपक्रमात वाढदिवसाच्या नावाखाली मेट्रो रेल्वे बुक करून त्यात हुल्लडबाजी करणे आणि जुगार खेळण्याचा प्रकार महामेट्रोची बदनामी करण्यासाठीच घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी या घटनेला संघटनेची मॉकड्रील असल्याचा दावा केला. मात्र, या घटनेच्या तीन दिवसांनंतर संपूर्ण व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणावरील हवा निघाली आहे. महामेट्रोने ही बाब गांभीर्याने घेत पोलीस तक्रार केल्याने हे प्रकरण आता पाताळयंत्रीपणा करणाऱ्यांवर शेकण्याची शक्यता आहे.
नॉन फेअर रेव्हेन्यू वाढविण्यासाठी मेट्रो रेल्वे प्रशासनाने ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल्स’ ही योजना सुरू केली. त्यानुसार, शेखर शिरभाते या व्यक्तीने आपल्या वाढदिवसासाठी मेट्रो रेल्वेचा कोच बुक केला. अॅक्वा लाइनवर सीताबर्डी ते लोकमान्यनगरपर्यंत वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाढदिवसात नाच-गाणे करण्यासाठी तृतीयपंथीयांना नेण्यात आले. तृतीयपंथी नाच-गाणे करीत असताना, वाढदिवसात सहभागी नागरिकांनी त्यांच्यावर पैशांची उधळण केली, तर काही जण जुगार खेळत बसले होते. जुगार खेळताना पैसेही लावण्यात येत होते. हा गंभीर प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून सोइस्करपणे व्हायरलही करण्यात आला. या व्हिडीओमुळे देशभरात नागपूर मेट्रोची बदनामी झाली.
प्रसारमाध्यमांनीही मेट्रोत असे प्रकार सुरू असल्याबाबत गंभीर दखल घेतली होती. मात्र, हा सर्व प्रकार एक पूर्व नियोजित कट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी मेट्रोतील सुरक्षा व्यवस्था तपासण्यासाठी संघटनेने आयोजित केलेली ही मॉकड्रील असल्याचे शनिवारी पत्रकार परिषद घेत सांगितले. यामुळे आता या प्रकरणातील गांभीर्यच निघून गेले आहे.
..........
हुल्लडबाजांनी नागपूरकरांना याची उत्तरे द्यावी
- मॉकड्रीलसाठी दुसऱ्याच्या नावाने बुकिंग का केले?
- प्रकार घडला, त्या दिवशी पत्रकार परिषद का घेतली नाही?
- मेट्रोने तक्रार दिल्यानंतर मॉकड्रीलचे कारण का पुढे केले?
- मेट्रोच्या सुरक्षा व्यवस्थेत शिरून एखाद्या संघटनेला मॉकड्रील करण्याचा अधिकार आहे काय?
- नागपूरकरांसाठी उभारण्यात आलेही ही व्यवस्था आपणच बदनाम करीत आहोत का?