नागपुरात चित्रपटगृहात दंगा; महिला-मुलींचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 03:15 PM2019-06-24T15:15:14+5:302019-06-24T15:15:48+5:30
रविवारी रात्री शहरातील पंचशील या सिनेमागृहात कबीर सिंग हा चित्रपट सुरू असताना मध्येच गोंधळ घालून महिलांची छेड काढण्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी रात्री शहरातील पंचशील या सिनेमागृहात कबीर सिंग हा चित्रपट सुरू असताना मध्येच गोंधळ घालून महिलांची छेड काढण्याची घटना घडली. या छेड काढणाऱ्या सडकछाप मजनूंना सीताबर्डी पोलिसांनी कोठडीत टाकले.
पंचशील सिनेमागृहात रविवारी कबीर सिंग हा चित्रपट सुरू असताना रात्री १०.४५ च्या सुमारास बाल्कनीत अचानक शुभम दयाशंकर केसवानी (वय २०, रा. चौधरी चौकाजवळ), मोहीत उर्फ मोनू ललीतकुमार पंजवानी (वय २१, रा. आहुजा नगर), हेमंत केशवदास ममतानी (वय ३०, रा. श्रीकलगीधर सत्संग जवळ), बिपीन जियालाल डेमला (वय २४, रा. हुडको कॉलनी) आणि पुनित नरेशकुमार माखिजा (वय २३) या आरोपींनी आरडाओरड करून गोंधळ सुरू केला. एवढ्यावरच ते थांबले नाही. आजुबाजूला बसलेल्या प्रेक्षकांच्या सीटवर चढून ते नाचू लागले. या प्रेक्षकांनी त्यावर हरकत घेतली असता ही मुले त्यांना मारहाण करू लागली. काही महिला-मुलींच्या चेहºयावर मोबाईलचे टॉार्च मारून त्यांची छेडही काढली. त्यामुळे चित्रपटगृहात प्रचंड गोंधळ सुरू झाला. अनेक महिला-मुलींनी चित्रपटगृहातून बाहेर धाव घेतली. आरोपींना काहींनी समजावण्याचे प्रयत्न केले असता ते मारहाण करू लागले. आरोपींनी दंगा सुरू केल्याची माहिती कळताच सीताबर्डीचा पोलीस ताफा तेथे पोहचला. त्यांनी शुभम केसवानी, मोनू पंजवानी, हेमंत ममतानी, बिपीन डेमला आणि पुनित माखिजा यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात आणले असतानाच संतप्त महिलांचा घोळका ठाण्यात पोहचला. आरोपींनी आपल्या आसनावर (सीटवर) चढून लज्जास्पद वर्तन केल्याची तक्रार ३५ वर्षीय महिलेने नोंदवली. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध सिनेमागृहात दंगा करून महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. उपरोक्त आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींचे साथीदार फरार
प्रत्यक्षदर्शी सूत्रांच्या माहितीनुसार, उपरोक्त आरोपींचे आणखी काही साथीदार या गुन्ह्यात सहभागी होते. ते महिला मुलींसोबत लज्जास्पद वर्तन करीत होते. पोलीस आल्याचे पाहून त्यांनी गर्दीत शिरून पलायन केल्याचे समजते.