नागपुरात शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:37 AM2018-05-01T00:37:20+5:302018-05-01T00:37:35+5:30

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातला. शिवसेनेचे कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत असताना विदर्भवाद्यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे वातावरण तापले व हमरीतुमरीपर्यंत वेळ आली. तापलेले वातावरण लक्षात घेता राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

Riots between Shiv Sena-Vidharbhavadi in Nagpur | नागपुरात शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये राडा

नागपुरात शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये राडा

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भाचा मुद्दा पेटला : श्रीहरी अणेंच्या बोलण्यास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :

   महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातला. शिवसेनेचे कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत असताना विदर्भवाद्यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे वातावरण तापले व हमरीतुमरीपर्यंत वेळ आली. तापलेले वातावरण लक्षात घेता राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्र मॅक्सिमस : द स्टेट, इट्स सोसायटी अ‍ॅन्ड पॉलिटिक्स’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात शिवसेना खा.आनंद अडसूळ, अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे, अ‍ॅड.श्रीहरी अणे, ‘वनराई’चे विश्वस्त गिरीश गांधी, साहित्यिक वि.स.जोग हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वेगळ्या विदर्भाची चर्चा कल्पनाविलास आहे का, या मुद्यावर अ‍ॅड.अणे यांचे मत विचारण्यात आले. अ‍ॅड.अणे यांनी याचे उत्तर तर येथे उपस्थित विदर्भवादीच आपले हात वर करून देतील, असे म्हटले. यावर सभागृहात उपस्थित शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सर्व कार्यकर्ते अ‍ॅड.अणे यांच्यासमोर एकत्र झाले व संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करायला लागले. यावेळी विदर्भवादी कार्यकर्ते अणे यांच्या समर्थनार्थ समोर आले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरश: धक्काबुक्कीदेखील सुरू झाली. सातत्याने २ ते ३ वेळा असा प्रकार झाला. अखेर खा.आनंद अडसूळ हे आपली भूमिका मांडायला उभे झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शांत झाले.
विदर्भवाद्यांवर अडसूळ यांची टीका
दरम्यान, खा.अडसूळ यांनी विदर्भवाद्यांवर जोरदार टीका केली. हा चर्चासत्राचा कार्यक्रम होता. मात्र अ‍ॅड.अणे यांनी जाणुनबुजून वेगळ्या विदर्भाच्या बाजूने लोक आहेत, असे म्हणून वादाला सुरुवात केली. चर्चासत्रादरम्यान दुसऱ्या बाजूची मते ऐकण्याची त्यांची मानसिकताच नाही. मोजक्या लोकांच्या भावनांना ते सर्व जनतेच्या भावना कशा सांगतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अणेंचा सवाल, राज्यात कशाला रहायचे ?
यासंदर्भात अ‍ॅड.श्रीहरी अणे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता मत मांडू न देण्यासाठीच हा गोंधळ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही वेगळ्या विदर्भाबाबत मत मांडले की लोकांना त्रास होतो. अशा राज्यामध्ये राहण्याचा अर्थ काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा गोंधळ नियोजित होता व अमरावतीहून भाडोत्री माणसे बोलविण्यात आली होती, असा आरोप त्यांनी लावला.
१ मे रोजी वातावरण तापणार?
१ मे रोजी महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांकडून विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येणार आहे. जर महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांनी काळा झेंडे लावून निषेध केला तर तो महाराष्ट्राचा अपमान ठरेल. अशा वेळी शिवसेना त्यांना तसेच प्रत्युत्तर देईल, असा इशारा खा.अडसूळ यांनी यावेळी दिला. त्यामुळे १ मे रोजी उपराजधानीतील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी पोलीस आयुक्त झाले आक्रमक
नागपुरचे पोलीस आयुक्त राहून चुकलेले वेगळ्या विदर्भाचे समर्थक प्रबीरकुमार चक्रवर्ती हेदेखील यावेळी आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत अगोदर त्यांची शाब्दिक चकमक झाली व त्यानंतर अगदी हमरीतुमरीपर्यंत वेळ आली. कॉंग्रेसचे पदाधिकारी अ‍ॅड.संदेश सिंगलकर यांनी मध्यस्थी करत चक्रवर्ती यांना दूर नेले. पोलीस आयुक्त पदावर राहून चुकलेल्या चक्रवर्ती यांच्याकडून अशाप्रकारची वागणूक अपेक्षित नव्हती, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.
लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार : दर्डा
लोकशाही प्रणालीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. हा कार्यक्रम राजकीय स्वरुपाचा नव्हे तर पुस्तक प्रकाशनाचा होता. यात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. आपला पक्ष मांडण्याची येथे प्रत्येकाला संधी होती व तसे नियोजनदेखील करण्यात आले होते. त्यामुळे कार्यक्रम शांततेत व्हायला हवा होता. जे काही झाले ते अतिशय दुर्दैवी आहे, असे मत माजी खा.विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
सर्वांची बाजू ऐकून घेणे महत्त्वाचे : गांधीhttp://cms.lokmat.com/topics/shivsena riots up on Vidarbha issue
विदर्भावरील या चर्चेत दोन्ही बाजूच्या लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते. खा.अडसूळ, वि.स.जोग यांच्याशिवाय इतर लोकदेखील मत प्रकट करणार होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असते तर त्यातून काही नवीन मुद्दे समोर आले असते. जो प्रकार झाला तो दुर्दैवी होता. शांतता व संयमाने चर्चा झाली असती तर चांगले झाले असते अशी भावना गिरीश गांधी यांनी व्यक्त केली. 

Web Title: Riots between Shiv Sena-Vidharbhavadi in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.