कुख्यात गुंडांचा हैदोस : नागपूरच्या प्रतापनगरात शिक्षक-विद्यार्थ्यांवर ताणले पिस्तूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:27 AM2018-10-13T00:27:09+5:302018-10-13T00:31:32+5:30

तडीपार गुंडांनी गुरुवारी शहरात पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर प्रचंड हैदोस घातला. आधी इमामवाड्यातील किराणा दुकानदाराकडून २० हजार रुपये लुटले. त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून पाच लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर प्रतापनगरात शिकवणी वर्गासमोर येऊन पिस्तुलाचा धाक दाखवत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनांची दखल घेत गुन्हे शाखेच्या पथकाने धावपळ करून शुक्रवारी दुपारी एका तडीपार गुंडासह दोघांच्या मुसक्या बांधल्या.

Riots up of notorious goons: Stretch pistols on teachers and students in Pratapnagar of Nagpur | कुख्यात गुंडांचा हैदोस : नागपूरच्या प्रतापनगरात शिक्षक-विद्यार्थ्यांवर ताणले पिस्तूल

कुख्यात गुंडांचा हैदोस : नागपूरच्या प्रतापनगरात शिक्षक-विद्यार्थ्यांवर ताणले पिस्तूल

Next
ठळक मुद्देइमामवाड्यात किराणा दुकानदाराला मारहाणपाच लाखांची खंडणी मागितलीदोघांना अटक, एक फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तडीपार गुंडांनी गुरुवारी शहरात पिस्तूल आणि चाकूच्या धाकावर प्रचंड हैदोस घातला. आधी इमामवाड्यातील किराणा दुकानदाराकडून २० हजार रुपये लुटले. त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून पाच लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर प्रतापनगरात शिकवणी वर्गासमोर येऊन पिस्तुलाचा धाक दाखवत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनांची दखल घेत गुन्हे शाखेच्या पथकाने धावपळ करून शुक्रवारी दुपारी एका तडीपार गुंडासह दोघांच्या मुसक्या बांधल्या. तर, एक फरार आहे. गनी ऊर्फ पलाश वासनिक (वय २४, रा. रामबाग), विशाल सोखांद्रे (वय ४०) आणि सनी चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत.
हे तिघेही कुख्यात गुंड आहे. त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे असून, एमपीडीए, तडीपारीसारखी कारवाई होऊनही त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीत फरक पडलेला नाही. गुरुवारी सायंकाळी किराणा व्यापारी सुलभ संजय दिवेकर (वय २२) हा घराजवळच्या पानटपरीवर उभा होता. तेथे हे तिघे आले. तेथे विशालने त्याला विणाकारण मारहाण केली. विरोध केला असता कुख्यात गनीने भला मोठा चाकू काढला. जास्त बदमाशी दाखवतो का, आम्हाला ओळखत नाही का, माझे नाव गनी आहे. येथे कुणालाही विचार गनी काय चीज आहे, असे म्हणत त्याने सुलभला जोरदार मारहाण केली. धोका ओळखून सुलभ घरी पळाला. त्याचा पाठलाग करून आरोपींनी त्याला त्याच्या घरासमोर बेदम मारहाण केली. पाच लाख रुपये दिले नाही तर तुझी हत्या करेन, अशी धमकी देऊन आरोपी पळून गेले. त्यानंतर गनी आणि सनी यामाहा मोटरसायकलने प्रतापनगरात पोहचले. आयटी पार्कमध्ये परसिस्टन्सजवळ नितीन संतोष त्रिपाठी (वय ४१) हे शिकवणी वर्ग घेतात. गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास शिकवणी वर्ग संपल्यानंतर ते बाहेर आले. यावेळी वर्गासमोर मोठ्या संख्येत विद्यार्थीही होते. तेवढ्यात तेथे यामाहा मोटरसायकलवर गनी आणि सनी आरडाओरड करीत आले. त्यांनी तेथील दुचाक्यांना लाथा मारून पाडले.
त्रिपाठी यांना शिवीगाळ करून त्यांनी ‘आम्हाला ओळखत नाही का, आम्ही इथले दादा आहोत’, असे म्हणून आपल्या जवळचे पिस्तूल काढले. ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या दिशने रोखत पिस्तुलाचा चाप ओढला. हा प्रकार बघून विद्यार्थी प्रचंड घाबरले. त्यांनी आरडाओरड करीत वाट मिळेल तिकडे पळणे सुरू केले. यावेळी तेथे नागरिकांची मोठी गर्दी होती. मात्र, आरोपीचे ज्या पद्धतीचे वर्तन होते, ते बघता कुणी हिंमत दाखवली नाही. दरम्यान, आरडाओरड, शिवीगाळ करीत आरोपी धमकी देऊन पळून गेले. त्रिपाठी यांनी प्रतापनगर ठाण्यात या घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. नंतर त्रिपाठी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींनी घटनास्थळी हवेत एक गोळी झाडल्याची चर्चा होती. मात्र, परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक मासाळ यांनी लोकमतशी बोलताना फायरिंगचा इन्कार केला. आरोपींनी पिस्तूल काढून केवळ धाक दाखवल्याचे ते म्हणाले. दरम्यान, वर्दळीच्या ठिकाणी गुंडांनी थेट शिक्षक व विद्यार्थ्यांवर पिस्तूल ताणल्याच्या प्रकाराची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. प्रतापनगरचे ठाणेदार राजेंद्र पाठक, तसेच गुन्हे शाखेचेही पथकांनीही आरोपींची शोधाशोध सुरू केली.

आरोपींचा छडा लागला
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींच्या मोटरसायकलचा क्रमांक मिळवला. त्यानंतर रामबागमधून पोलिसांनी गनी आणि सनीला ताब्यात घेतले. त्यांनी उपरोक्त दोन गुन्ह्यांसोबतच विशालसोबत इमामवाड्यात केलेल्या गुन्ह्याचीही कबुली दिली. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेला सनी चव्हाण हा तडीपार गुंड असून तो शहरातच राहतो, हे यातून स्पष्ट झाले. लोकमतने तडीपार गुंडांचे शहरातच वास्तव्य असल्याचे वृत्त यापूर्वी अनेकदा प्रकाशित केले आहे. तडीपार गुंडांना पकडण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र पथक निर्माण केले. मात्र, हे पथकही फारसे प्रभावीपणे काम करीत नसल्याचे गेल्या दोन दिवसात तीन तडीपार गुंडांच्या अटकेतून स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: Riots up of notorious goons: Stretch pistols on teachers and students in Pratapnagar of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.