बावनकुळेंचा उदय झाल्यास केदारांच्या वाढत्या प्रस्थालाच ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 07:00 AM2021-12-12T07:00:00+5:302021-12-12T07:00:08+5:30

Nagpur News विधान परिषदेच्या निवडणुकीत बावनकुळे विजयी झाले तर केदार यांच्या वाढत्या प्रस्थालाच ब्रेक लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

With the rise of Bavankule, the rising tide of Kedar will break | बावनकुळेंचा उदय झाल्यास केदारांच्या वाढत्या प्रस्थालाच ब्रेक

बावनकुळेंचा उदय झाल्यास केदारांच्या वाढत्या प्रस्थालाच ब्रेक

googlenewsNext
ठळक मुद्देकेदारांनी म्हणूनच निवडणूक अंगावर घेतली बावनकुळेही जोरात

कमलेश वानखेडे

नागपूर : विधानसभा निवडणुकीत भाजपने कामठीतून चंद्रशेखर बावनकुळे  (Chandrasekhar Bavankule ) यांचे तिकीट कापल्याने ते मुख्य राजकीय प्रवाहातून मागे पडले. त्यामुळे गेली दोन वर्षे मंत्री झालेल्या सुनील केदार ( Sunil Kedar) यांना ग्रामीणमध्ये रान मोकळे मिळाले. याचा पुरेपूर फायदा केदारांनी उचलला. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत बावनकुळे विजयी झाले तर केदार यांच्या वाढत्या प्रस्थालाच ब्रेक लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

नागपूर ग्रामीणचा विचार केला तर काँग्रेसमधून सुनील केदार व भाजपमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा बोलबाला आहे. त्यामुळे ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, बाजार समिती किंवा सहकार क्षेत्रातील कोणतीही निवडणूक असो या दोन नेत्यांमध्येच सामना रंगतो. विधानसभेच्या निवडणुकीतही केदार स्वत:च्या सावनेर मतदारसंघासह इतरही मतदारसंघात सहकारी उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरतात. तीच जबाबजारी बावनकुळे भाजपसाठी पार पाडतात. दोघांनीही एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेतल्याचीही उदाहरणे आहेत. एकूणच पाहता केदार व बावनकुळे यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई आहे.

कामठीत तिकीट कटल्यानंतर बावनकुळे हे काहीसे कमजोर झाले होते. त्यांचे पुनर्वसन होणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. बावनकुळेच मैदानात नसल्याने ग्रामीणमध्ये भाजपचा ग्राफही घसरत चालला होता. नेमका याचाच फायदा केदार यांनी उचलला. मंत्री होताच केदार पायाला भिंगरी बांधल्यागत जिल्हाभर फिरले. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूक तर केदारांनी अंगावरच घेतली. बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात शड्डू ठोकत भाजपच्या तीन सिटिंग जागा केदार यांनी पाडून दाखविल्या. त्यानंतर झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही केदारांनी कामठी, नागपूरसह इतरत्रही हात मारला. बावनकुळे प्रयत्न करीत होते; पण आमदारकी नसल्यामुळे त्यांना जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. आता बावनकुळे जिंकून पुन्हा आमदार झाले तर त्यांचा ग्राफ निश्चितच वाढेल व केदारांच्या वाढत्या प्रस्थाला अप्रत्यक्षपणे ब्रेक लागेल, असे जानकारांचे म्हणणे आहे.

बावनकुळेंवर सावनेरची जबाबदारी?

- बावनकुळे विधान परिषदेची निवडणूक जिंकले तर २०२४ ची विधानसभा निवडणूक लढणार नाहीत. ते प्रचारासाठी धुरा सांभाळतील. भाजपच्या गोटातील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बावनकुळे यांच्यावर केदार यांच्या सावनेर मतदारसंघाची विशेष जबाबदारी दिली जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच नियोजन केले जाणार आहे.

नगर परिषदेत रंगणार सामना

- २०२२ मध्ये जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत केदार व बावनकुळे असाच सामना रंगणार आहे. याची झलक मात्र याच वर्षात २१ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या हिंगणा व कुही नगर पंचायतीच्या निवडणुकीत दिसून येईल. या दोन्ही ठिकाणी बावनकुळेंच्या जाहीर सभा लागल्या आहेत.

महापालिकेसह नगर परिषदेच्या निवडणुकीवरही परिणाम

- गेल्या दोन वर्षांत केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस लहान-मोठ्या सर्वच निवडणुका जिंकत आली. त्यामुळे फेब्रुवारीत होऊ घातलेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीची धुराही केदार यांच्याकडे द्यावी, असा सूर काँग्रेसमधून येऊ लागला होता. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवाराची निवड ते बदलण्यापर्यंत जी काही सर्कस झाली त्यामुळे काँग्रेसच्या इमेजला धक्का बसला आहे. याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीवर होईल, असेही मत जानकारांनी व्यक्त केले आहे.

Web Title: With the rise of Bavankule, the rising tide of Kedar will break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.