अंध ऋषिकेशने शोधली प्रकाशवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:52 AM2018-05-31T10:52:45+5:302018-05-31T10:52:57+5:30
अंधारातून प्रकाशाची वाट गवसायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हा बोध एका शेतमजुराच्या अंध मुलाने घेतला. आज बारावीचा निकाल हाती आल्यावर समाजाला त्याची जिद्द आणि मेहनतीचा साक्षात्कार झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंधारातून प्रकाशाची वाट गवसायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हा बोध एका शेतमजुराच्या अंध मुलाने घेतला. आठव्या वर्गापासून त्याने गाव सोडून शहरात प्रगतीच्या वाटा शोधू लागला. आज बारावीचा निकाल हाती आल्यावर समाजाला त्याची जिद्द आणि मेहनतीचा साक्षात्कार झाला. ऋषिकेश अनिल अढाव असे या अंध विद्यार्थ्याचे नाव आहे. परिस्थिती आणि अपंगत्वावर मात करून त्याने ८५.३८ टक्के गुण मिळवीत कला शाखेत प्रथम येण्याचा मान मिळविला. भविष्यात आयएएसचे स्वप्न त्याने बाळगले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उबाळखेड येथील ऋषिकेश अढाव हा जन्मांध आहे. वडील शेतमजूर, त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच. अंधत्वामुळे आपण शेतीही करू शकणार नाही? याची खंत त्याला होती. आठवीपर्यंत त्याने गावातच शिक्षण घेतले. शिक्षकांकडून त्याला शिक्षणाची प्रेरणा मिळाली. नवव्या वर्गात गाव सोडून तो नागपुरात दाखल झाला. चोखामेळा वसतिगृहात राहून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे बाराव्या वर्गासाठी अंध विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकर महाविद्यालयातून त्याने बारावीची परीक्षा दिली. अभ्यासासाठी उपलब्ध असलेली ब्रेलची पुस्तके व आॅडिओ कॅसेट्सद्वारे त्याने अभ्यास केला.