पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने ऑटो चालविणे परवडत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:10 AM2021-02-21T04:10:18+5:302021-02-21T04:10:18+5:30

नागपूर : गेल्या आठ महिन्यांत पेट्रोलच्या व डिझेलच्या किमतींत २० ते २२ रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किमती ...

Rising petrol and diesel prices make driving unaffordable | पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने ऑटो चालविणे परवडत नाही

पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने ऑटो चालविणे परवडत नाही

Next

नागपूर : गेल्या आठ महिन्यांत पेट्रोलच्या व डिझेलच्या किमतींत २० ते २२ रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किमती शंभरी गाठायला अवघे दोन ते तीन रुपये शिल्लक आहेत. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सामान्यजण त्रस्त आहेतच; पण ऑटो रिक्षाचालक हा वर्ग पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे बेजार झाला आहे. ऑटो चालविणे परवडतच नाही, अशी खंत ऑटोचालकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे काही मार्गावर ऑटोचालकांनी प्रवासी दरात वाढही केली आहे. मात्र काही मार्गांवर गेल्या तीन ते चार वर्षांपासून आहे त्याच दरावर ऑटोचालक प्रवासी वाहतूक करीत आहेत.

नागपुरात दोन प्रकारचे ऑटो धावतात. रेल्वेस्थानकावरून धावणारे किमान २५० ते ३०० ऑटो हे मीटरद्वारे चालतात; तर बहुतांश ऑटो सवारीने चालतात. शहरातील सीताबर्डी, रेल्वेस्थानक या परिसरांतून वेगवेगळ्या भागांत धावणाऱ्या ऑटोचालकांचा आढावा घेतला असता, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचे दुखणे त्यांनी ‘लोकमत’पुढे व्यक्त केले. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, ऑटोचे हप्ते, वाहतूक पोलिसांकडून होत असलेले चालान, ऑटोचा विमा हे सर्व भरता-भरता ऑटोचालकांच्या नाकी नऊ येत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. पेट्रोल शंभरी गाठत असतानाही आम्ही हिंगण्यापर्यंत ३० रुपयांमध्ये प्रवासी घेऊन जात असल्याचे ऑटोचालकांचे म्हणणे आहे. ऑटोची दरवाढ प्रवाशांना मान्य नसल्यामुळे नाइलाजास्तव तीन ते चार वर्षांपासून जे दर आहे, त्याच दरांत प्रवासी वाहतूक करावी लागत असल्याचे ऑटोचालक म्हणाले.

पण शहरातील काही भागांत ऑटोचालकांनी ऑटोची दरवाढही केल्याचे निदर्शनास आले. सीताबर्डी ते रामेश्वरी, सीताबर्डी ते मानेवाडा, सीताबर्डी ते म्हाळगीनगर या मार्गांवर धावणाऱ्या ऑटोचालकांनी प्रतिप्रवासी भाडे १० रुपयांनी वाढविल्याचे सांगितले; पण काही भागांत ऑटो दरवाढ प्रवाशांना मान्य नसल्याचेही दिसून आले.

- काही भागांत ऑटोचालकांनी दर वाढविले

रेल्वेस्थानक ते वैष्णोदेवी चौक - पूर्वी १२० रुपये, आता १५० रुपये

मुंजे चौक ते रामेश्वरी - पूर्वी १० रुपये, आता २० रुपये प्रतिप्रवासी

मुंजे चौक ते मानेवाडा - पूर्वी २० रुपये, आता ३० रुपये प्रतिप्रवासी

- या मार्गावर ऑटो दर पूर्वीप्रमाणेच

सीताबर्डी ते जयताळा - २० रुपये

सीताबर्डी ते हजारीपहाड - २० रुपये

सीताबर्डी ते हिंगणा - ३० रुपये

- पेट्रोलच्या वाढलेल्या दरामुळे जुन्या ऑटो रेटमध्ये प्रवासी वाहतूक करणे परवडणारेच नव्हते. पूर्वी आम्ही वैष्णोदेवी चौक ते रेल्वेस्थानकाचे १२० रुपये घ्यायचो. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे आम्हाला १५० रुपये करावे लागले. इंधन वाढले असताना प्रवाशी जुन्याच दराने चालण्याचा आग्रह धरतात.

- अनिस शेख, ऑटोचालक

- ऑटोचे इन्शुरन्स, आरटीओ टॅक्स यांचाच खर्च वर्षाला १० हजार रुपयांच्या वर जातो. आम्ही झाशी राणी चौक ते हिंगणा, जयताळा, हजारीपहाड या मार्गांवर ऑटो चालवितो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जयताळा २०, हजारीपहाड २०, हिंगणा ३० रुपये प्रतिसवारी घेत आहे; पण इंधन वाढल्याने परवडण्यासारखे नाही. आम्ही पैसे वाढविले तर प्रवाशांना मान्य नाही. कोरोनामुळे ऑटोत जास्त प्रवासी बसत नाहीत. आम्ही रेटवरून अडून बसलो तर बाहेरचे ऑटोचालक येऊन कमी पैशांत प्रवासी घेऊन जातात. ऑटो चालवून कसेबसे खाण्यापुरता पैसा मिळत आहे.

- संतोष शेंडे, ऑटोचालक

- प्रिपेडवाल्यांची २०१२ पासून भाडेवाढ केली नाही

मुख्य रेल्वे स्थानकावर प्रीपेड ऑटो सेवा संचलित आहे. जवळपास २८० ऑटो येथून प्रीपेड ऑटोसेवा देतात. २०१२ मध्ये आरटीओने केलेल्या सर्वेक्षणानुसार १४ रुपये प्रतिकिलोमीटर हा दर ठरवून दिला होता. तेव्हापासून आम्ही याच दराने प्रवासी वाहतूक करीत आहोत. बऱ्याचदा आम्ही दरवाढ करावी, अशी मागणीही केली; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता पेट्रोलच्या किमती शंभरी गाठत आहे. अशात या दराने प्रवासी वाहतूक करणे परवडणारे नाही.

अल्ताफ अन्सारी, अध्यक्ष, लोकसेवा प्रीपेड ऑटोचालक मालक संघटना

- इंधनाचे दर वाढल्याचा फटका प्रत्येक सामान्य व्यक्तीला बसला आहे. अशात ऑटोवाल्यांनी दरवाढ केल्यास चुकीचे नाही.

- प्रियांशू रंगारी, प्रवासी

Web Title: Rising petrol and diesel prices make driving unaffordable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.