World Multiple Sclerosis day : दर पाच मिनिटात एकाला ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 10:44 AM2022-05-30T10:44:01+5:302022-05-30T10:49:12+5:30
मेंदू, पाठीच्या कण्यातील थर खराब करतोय मल्टिपल स्क्लेरोसिस
नागपूर : मेंदू व पाठीचा कणामधील ‘मायलिन’चा थर खराब करणारा आजार म्हणून ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ ओळखला जातो. याचा प्रभाव अशक्तपणापासून ते शारीरिक अक्षमतेपर्यंत होतो. जगात दर पाच मिनिटांनी एकाला या आजाराचे निदान होते अशी माहिती, ‘ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशलिटी ग्रुप ऑफ डब्ल्यूएफएन’चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.
३० मे हा दिवस जागतिक ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ (एमएसएस) म्हणून पाळला जातो. या रोगाबद्दलच्या जनजागृतीसाठी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. डॉ. मेश्राम म्हणाले, हा आजार होण्यामागे नेमके कारण पुढे आलेले नाही. परंतु, यात अनुवांशिकता व पर्यावरण हे दोन्ही घटक गुंतले आहे.
ही आहेत लक्षणे
या रोगाच्या रुग्णांमध्ये मुंग्या येणे, शरीराच्या एका बाजूला किंवा हातापायांमध्ये कमजोरी येणे, हालचालीमध्ये असंतुलन, थरथरणे, थकवा, वेदना, दृष्टिदोष, दुहेरी दृष्टी, चक्कर येणे, मूत्राशय, पोटाचे विकार व लैंगिक समस्या यासह अनेक लक्षणे आढळतात.
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक आहे. सरासरी २५ ते ३० वयात याची सुरुवात होते. काही रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे काही दिवस किंवा आठवड्यापर्यंतच राहतात. त्यानंतर काही महिने किंवा अनेक वर्षांनंतर पुन्हा रोगाची लक्षणे दिसून येतात. याला ‘रीलेप्सिंग-रेमिटिंग’ म्हटले जाते.
हमखास उपचार नाही
या रोगावर हमखास उपचार नाही. यामुळे लवकर निदान झाल्यास रुग्णाचा त्रास कमी होऊ शकतो. मागील २० वर्षांमध्ये रोग सुधारण्याचे औषध विकसित करण्यात आले आहेत. असेही डॉ. मेश्राम म्हणाले.
डॉ. चंद्रशेखर मेश्राम, न्यूरोलॉजिस्ट
२८ लाखांहून अधिक लोक या रोगाने ग्रस्त
इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी अध्यक्ष निर्मल सूर्या म्हणाले, जगात २८ लाखांहून अधिक ‘मल्टिपल स्क्लेरोसिस’ने ग्रस्त आहेत. या रोगाबद्दल जागरूकता वाढविणे व त्याचा प्रभाव कमी करणे हे संघटनेचे ध्येय आहे.
१० लाख व्यक्तींमागे ५ ते १० रुग्ण
बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथील न्यूरोसायन्सचे संचालक पद्मश्री डॉ. बी. एस. सिंघल म्हणाले, काही दशकांपूर्वी हा रोग भारतात दुर्मीळ मानला जात होता. परंतु, न्यूरोलॉजिस्टची संख्या वाढल्यामुळे या रोगाचे निदान लवकर होत आहे. देशात जवळपास १० लाख व्यक्तींमागे ५ ते १० रुग्ण आढळतात.