कृषी निविष्ठांच्या किमती वाढल्याने नियाेजन गडबडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:37+5:302021-06-01T04:07:37+5:30
राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : राेहिणी नक्षत्र सुरू झाले असून, पावसाचे आगमन झाले नसले तरी शेतकऱ्यांनी बियाणे ...
राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : राेहिणी नक्षत्र सुरू झाले असून, पावसाचे आगमन झाले नसले तरी शेतकऱ्यांनी बियाणे व रासायनिक खते खरेदीसाठी धापपळ सुरू केली आहे. तत्पूर्वी, त्यांनी शेतीची खरीपपूर्व मशागतीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. यावर्षी बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांच्या किमतीत वाढ झाल्याने आर्थिक नियाेजन गडबडले आहे, अशी प्रतिक्रिया रामटेक तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतीची खरीप हंगामपूर्व कामे पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाने चालू खरीप हंगामात रामटेक तालुक्यात २०,८०२ हेक्टरमध्ये धान, ३,५०० हेक्टरमध्ये कपाशी व २,१०० हेक्टरमध्ये तुरीच्या पिकाचे नियाेजन केले आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानाची राेवणी करीत असल्याने त्यांनी बांध्या साफ करून पऱ्हे टाकण्याचीही व्यवस्था केली आहे. सध्या पऱ्हे टाकण्याची याेग्य वेळ आहे. मात्र, दरवर्षी हवामान खात्याचा पावसाबाबतचा अंदाज चुकत असल्याने तसेच माेसमी वाऱ्याच्या पावसाचे आगमन न झाल्याने आपण पऱ्हे टाकण्याची हिंमत केली नाही, असेही धान उत्पादकांनी सांगितले.
सिंचनाच्या प्रभावी सुविधेचा अभाव व किडींमुळे हाेणारे धानाचे नुकसान लक्षात घेता, रामटेक तालुक्यात कपाशीचा पेरा वाढत असल्याचे तसेच तालुक्यात कापसाचे चांगले उत्पादन हाेत असल्याचेही मागील काही वर्षांपासून निदर्शनास आले आहे. यावर्षी केंद्र शासनाने कपाशीच्या बियाण्याच्या किमतीत वाढ केली आहे. साेबतच शासनाने अतिरिक्त सबसिडी जाहीर करून रासायनिक खतांच्या किमती नियंत्रित केल्या आहेत. मात्र, केवळ डीएपी १,२०० रुपये प्रति बॅग मिळत असून, इतर संयुक्त व मिश्र खतांच्या किमतीत साधारणत: ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
...
पीक कर्ज व बाेनसचा तिढा
पीक कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवीन पीक कर्जासाठी बँकांकडे अर्ज केले असले तरी, मंजुरी प्रक्रिया संथ असल्याने पीक कर्जाची रक्कम मिळण्यास विलंब हाेणार आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील धान राज्य शासनाला किमान आधारभूत किमतीप्रमाणे विकला आहे. त्या धानाचा प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनसही अनेकांच्या बँक खात्यात अद्याप जमा करण्यात आला नाही. काहींना धानाचे चुकारेही मिळाले नाही. प्राेत्सााहन निधीचे प्रत्येकी ५० हजार रुपयेही मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबत बँका, प्रशासन व शासन काेणताही सकारात्मक निर्णय घ्यायला तयार नाही.
...
बियाण्यांच्या उगवणशक्तीवर प्रश्नचिन्ह
पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्या, घरगुती बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करा, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षण करून रासायनिक खतांचे याेग्य नियाेजन करा, रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खतांचा वापर करा, पुरेसा पाऊस काेसळल्याशिवाय पेरणी अथवा राेवणी करू नका, यासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे. दुसरीकडे, किडी, राेग व प्रतिकूल वातावरणामुळे घरगुती बियाण्यांच्या उगवणशक्ती व उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती व प्रशासनाची उदासीनता यामुळे शेतकरी आर्थिक काेंडीत सापडले आहेत.