- तर होऊ शकतो धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:42 AM2017-10-31T00:42:45+5:302017-10-31T00:44:44+5:30
देशातील प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये गणना होत असलेल्या नागपूर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय जर्जर झाली असून, .....
आशिष दुबे /
विशाल महाकाळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये गणना होत असलेल्या नागपूर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय जर्जर झाली असून, ती कधीही पडू शकते. १५० वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीचे आयुष्यच आता संपले असल्याची जाणीव असूनदेखील महाविद्यालय प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे. शेकडो कर्मचारी व विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून या इमारतीचा उपयोग सुरूच आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, १५० वर्षे जुन्या असलेल्या या इमारतीमध्ये १९०६ साली महाविद्यालयाची स्थापना झाली. या इमारतीचा ‘रेकॉर्ड’ आतादेखील ब्रिटिश अधिकाºयांजवळ आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला पत्रदेखील पाठविले होते. या इमारतीचे आयुष्य आता संपले असून ती कधीही पडू शकते, असा स्पष्ट इशाराच यात देण्यात आला होता. मात्र या पत्राला अधिकाºयांनी गंभीरतेने घेतले नाही. विद्यार्थी व कर्मचाºयांच्या जीवाचे मोल लक्षात न घेता बेजबाबदार भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
‘हेरिटेज’ इमारतीचा दर्जा
कृषी महाविद्यालयाच्या या इमारतीला ‘हेरिटेज’ इमारतीचा दर्जा आहे. मात्र तरीदेखील या इमारतीचे संवर्धन व्हावे, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळेच इमारतीची अवस्था वाईट झाली आहे. ‘हेरिटेज’ इमारत असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असा दावा महाविद्यालय प्रशासनातील अधिकाºयांनी केला आहे. मात्र त्यांनी याची माहिती राज्य सरकार व संबंधित विभागाला दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अधिकारी म्हणतात, माहितीच नाही
यासंबंधात इमारतीचे स्थावर अधिकार डॉ.खवले व डॉ.विलास तेलगोटे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. इमारतीची जबाबदारी आपल्याकडे येत नसल्याचे डॉ.खवले यांनी स्पष्ट केले. तर आपण स्थावर अधिकारी असलो तरी केवळ पाणी व विजेची देयके भरण्याचेच काम करतो. इमारतीची जबाबदारी अभियांत्रिकी विभागाची आहे, असे डॉ.तेलगोटे यांनी सांगितले. दोन्ही अधिकाºयांनी माहिती देण्यास नकार दिल्यानंतर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एन.डी.पर्लावार यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. जी माहिती घ्यायची आहे ती जनसंपर्क अधिकाºयांकडून घ्या, असे सांगत त्यांनी बोलण्यास नकार दिला.
छत, भिंतींची अवस्था खराब
इमारतीचे वास्तव लक्षात येऊ नये, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने तळमजल्यावर रंगकाम केले आहे. मात्र नीट पाहिले असता इमारतीचे छत व भिंती खराब अवस्थेत असल्याचे लक्षात येते. इमारतीचा ‘टॉवर’ व लागून असलेले छताचे पोपडे पडण्यास सुरुवात झाली आहे. भिंतींनादेखील तडे गेले असून, दोन भागांत विभागल्या गेली आहे.