Corona Virus in Nagpur; उपराजधानीत कोरोनाच्या संसर्गाचा धोका ड्रोनद्वारे हेरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:52 AM2020-04-11T08:52:46+5:302020-04-11T08:53:20+5:30
पोलीस उपस्थित नसल्याचे पाहून होत असलेली ठिकाणची गर्दी टिपण्यासाठी आणि ती पिटाळून लावण्यासाठी पोलीस आता ड्रोनचा वापर करणार आहेत.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस उपस्थित नसल्याचे पाहून होत असलेली ठिकाणची गर्दी टिपण्यासाठी आणि ती पिटाळून लावण्यासाठी पोलीस आता ड्रोनचा वापर करणार आहेत.
सध्या देशभरात कोरोनाने हाहाकार मचवला आहे. नागपुरात सुरुवातीपासून चांगल्या उपाययोजना करण्यात आल्यामुळे स्थिती नियंत्रणात आहे. ती तशीच नियंत्रणात राहावी आणि लवकरात लवकर नागपूर कोरोनामुक्त व्हावे यासाठी अवघे प्रशासन रात्रंदिवस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नये, यासाठी पोलीस अहोरात्र परिश्रम घेत आहेत. संचारबंदीदरम्यान रूट मार्च नाकेबंदी आणि गस्ती पथकाच्या माध्यमातून जनजागरण केले जात आहे. परंतु काहीजण याला दाद देत नसल्याचेही संतापजनक वास्तव आहे. पोलीस नसल्याचे बघून काहीजण घोळका करून चर्चा करतात तर फळ, भाजीबाजारात सोशल डिस्टन्सिंग न बाळगता एकमेकांना खेटून भाज्या-फळे खरेदी करतानाही दिसत आहेत.
फळे, भाज्या आणि आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करणारी ही मंडळी अनेक ठिकाणी मास्कचाही वापर करताना दिसत नाही. त्यामुळे अवघे प्रशासनात चिंंताग्रस्त झालेले आहे. यावर उपाय म्हणून पोलिसांनी आता ड्रोनच्या रूपातील तिसरा डोळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण चार ड्रोनचा वापर करून पोलीस उपराजधानीवर नजर ठेवणार आहेत. ज्या भागात गर्दी होताना दिसेल किंवा तसे संकेत मिळतील त्या भागात लगेच पोलिसांची पथके पोहोचतील आणि आणि कोरोनाच्या संसर्गाचा धोका पिटाळून लावला जाईल.
डीजीकडून मिळाले ड्रोन
नागपूर पोलिसांना डीजी आॅफिसकडून नुकताच एक अत्याधुनिक ड्रोन मिळालेला आहे तर पूर्वीचे तीन ड्रोनही नागपूर पोलिसांकडे उपलब्ध आहेत. त्यातील दोन ड्रोन सर्व्हिलन्स व्हॅनवर लावण्यात आलेले आहेत.
या ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवून कोणत्याच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतला दिली.