५२ नवजात शिशूंच्या अंधत्वाचा धोका टळला; नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाची जागरुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 10:34 AM2019-11-08T10:34:51+5:302019-11-08T10:38:36+5:30
३४ आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या व दीड किलोपेक्षा कमी वजनाच्या बालकांमध्ये ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’मुळे (आरओपी) अंधत्वाचा धोका असतो. याची दखल घेत मेडिकलच्या नेत्ररोग विभागाच्यावतीने अशा बालकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज’ हे नवजात शिशूंमध्ये अंधत्वाचे चौथे कारण ठरले आहे. विशेषत: ३४ आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या व दीड किलोपेक्षा कमी वजनाच्या बालकांमध्ये ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’मुळे (आरओपी) अंधत्वाचा धोका असतो. याची दखल घेत मेडिकलच्या नेत्ररोग विभागाच्यावतीने अशा बालकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठ महिन्यात २५६ चिमुकल्यांची तपासणी केली असता, ५२ बालकांमध्ये हा आजार आढळून आला. त्यांच्यावर तातडीने उपचार केल्याने अंधत्वाचा धोका टळला.
३७ आठवडे पूर्ण होण्यापूर्वी प्रसव झाल्यास त्याला ‘अकाल प्रसव’ (प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज) म्हटले जाते. पूर्ण दिवस भरलेले नसल्यामुळे अशा बालकांचा विकास पूर्ण झालेला नसतो. भारतात गेल्या काही वर्षांत याचे प्रमाण वाढले असताना ‘आरओपी’ रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे.
या आजारात जन्माला आलेल्या अर्भकाच्या नेत्रपटलाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची अस्वाभाविक वाढ होते. यामुळे कायमचे अंधत्व येणे किंवा दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. यामुळे जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची नेत्ररोग तज्ज्ञाकडून तपासणी करून घेणे आवश्यक असते. याची दखल नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी घेतली. त्यांच्या मार्गदर्शनात एक चमू मेडिकलच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (निओनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट), ‘पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’(पीआयसीयू) व वॉर्डात भरती असलेल्या अशा चिमुकल्यांची तपासणी करतात.
गेल्या आठ महिन्यात २५६ बालकांची तपासणी केली असता, ५२ बालकांमध्ये ‘आरओपी’ हा आजार आढळून आला. यातील गंभीर चिमुकल्यांवर लेसरद्वारे तर उर्वरित चिमुकल्यांना इंजेक्शनच्या मदतीने उपचार करण्यात आले. तातडीने उपचार मिळाल्याने नवजात शिशूंमधील अंधत्वाचा किंवा दृष्टी कमी होण्याचा धोका दूर झाला असून, नवी दृष्टी मिळाली.
नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्यांच्या वाढीत होतो फेरफार
नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान म्हणाले, बाळाच्या नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्यांची वाढ गरोदरपणाच्या साधारणपणे चौथ्या महिन्यात सुरू होते. ही वाढ गरोदरपणाच्या पूर्ण कालावधीमध्ये म्हणजे ४० आठवड्यांनी होते. जेव्हा मुदतपूर्व बाळ जन्मते तेव्हा रक्तवाहिन्यांच्या वाढीत फेरफार होतात. कारण गर्भाशयातील वातावरण व्यवस्था बाहेरच्या वातावरणात उपलब्ध नसते. परिणामी, नेत्रपटलाच्या रक्तवाहिन्यांची अयोग्य वाढीने ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’चा धोका वाढतो. मेडिकलमध्ये अकाली प्रसव झालेल्या किंवा बाहेरून आलेल्या अशा बालकांची तपासणीची मोहिमच हाती घेतली आहे.
कमी वजनाच्या बाळांची नेत्र तपासणी आवश्यक
अकाली प्रसव व कमी वजनाच्या बाळांची नेत्र तपासणी करणे आवश्यक असते. बालकांमध्ये आजार वाढल्यास लेसर किंवा इंजेक्शनद्वारे गोठण्याच्या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. या उपचार पद्धतीमुळे वाहिन्यांची अयोग्य वाढ थांबण्यास मदत होते. काही प्रकरणामध्ये नेत्रपटलाची मोठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. मेडिकलच्या नेत्ररोग विभागात अशा दारिद्र्य रेषेखालील असलेल्या रुग्णांवर नि:शुल्क उपचार केले जातात. गेल्या आठ महिन्यात ‘आरओपी’च्या ५२ बालकांवर उपचार करण्यात आले.
-डॉ. अशोक मदान, विभागप्रमुख, नेत्ररोग विभाग मेडिकल