विलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचऱ्यापासून संसर्गाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:07 AM2021-04-15T04:07:16+5:302021-04-15T04:07:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ३० लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात ४३ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. ...

Risk of infection from household waste in isolated patients | विलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचऱ्यापासून संसर्गाचा धोका

विलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचऱ्यापासून संसर्गाचा धोका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ३० लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात ४३ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. गंभीर रुग्णांना बेड मिळत नसल्याने भटकंती करावी लागत आहे. शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे गृहविलगीकरणात ३६ हजाराहून अधिक रुग्ण आहेत. या रुग्णांच्या घरातील कचरा संकलित करण्यासाठी सक्षम अशी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

गृहविलगीकरणात असलेल्या बहुसंख्य रुग्णांची माहिती आजूबाजूच्या लोकांना नाही. रुग्णांच्या घरातील कचरा गाडीत टाकला जातो. वास्तविक रुग्णांनीच आपल्या घरातील कचरा वेगळा संकलित करून कचरा गाडीत न टाकता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची गरज आहे. यासाठी मनपाने स्वतंत्र कचरागाड्या सुरू केलेल्या आहेत. परंतु शहरात सर्वच भागात गृहविलगीकरणात रुग्ण असल्याने यंत्रणा कमी पडत आहे.

....

मास्क कचऱ्यात टाकले जातात

वापरलेले मास्क कचऱ्यात टाकले जातात. ओला व सुका कचऱ्यासोबतच हा कचरा भांडेवाडी येथे नेला जातो. भांडेवाडीत संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने अन्य कचऱ्यासोबत मास्क डम्प केले जातात. नागरिकही मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट लावत नसल्याचे चित्र आहे.

....

बायो-वेस्टसाठी स्वतंत्र यंत्रणा

शहरातील रुग्णालयातून दररोज निघाणारे बायो-वेस्ट संकलित करण्याची जबाबदारी सुपर हायजेनिक कंपनीकडे दिली आहे. कंपनीच्या माध्यमातून हा कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. कोरोनामुळे शहरातील बायो-वेस्ट वाढले असून, दररोज ४ ते ५ टन बायो-वेस्ट संकलित केले जात आहे.

....

शहरात रोज निघणारा कचरा - ८०० ते ९०० टन

ओला कचरा - ६०० टन

सुका कचरा - ३०० टन

कचरा एकत्र करणारे कर्मचारी - १६००

....

शहरातील एकूण रुग्ण - २,२६,८६३

बरे झालेले रुग्ण - १,८३,७५९

उपचार घेत असलेले रुग्ण - ४३,१०९

गृहविलगीकरणातील रुग्ण - ३६,०००

....

विलगीकरणातील कचऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

शहरात गृहविलगीकरणात मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. अशा रुग्णांच्या घरातून निघणाऱ्या कचऱ्यातून संसर्ग होऊ नये याची खबरदारी म्हणून गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घरातून कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र २० गाड्या लावण्यात आल्या आहेत. यात गरजेनुसार वाढ केली जात आहे. कचरा वेगळा संकलित करून रुग्णांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे.

डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन

Web Title: Risk of infection from household waste in isolated patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.