एचआयव्हीमुळे मेंदूत राहते जंतूसंसर्गाची जोखीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:52 PM2017-12-02T23:52:44+5:302017-12-03T00:01:16+5:30
एचआयव्हीबाधितांना क्षयरोग किंवा जंतूसंसर्गाचा नेहमीच धोका असतो. परंतु आता याचा मेंदूच्या कार्यप्रणालीवरही प्रभाव पडतो. परिणामी, आफ्रिकन देशांमध्ये मेंदूमध्ये जंतूसंसर्ग, मिरगी, पक्षाघात आदीचे रुग्ण वाढत आहेत, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. जॉन ओमा यांनी दिली.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : एचआयव्हीबाधितांना क्षयरोग किंवा जंतूसंसर्गाचा नेहमीच धोका असतो. परंतु आता याचा मेंदूच्या कार्यप्रणालीवरही प्रभाव पडतो. परिणामी, आफ्रिकन देशांमध्ये मेंदूमध्ये जंतूसंसर्ग, मिरगी, पक्षाघात आदीचे रुग्ण वाढत आहेत, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. जॉन ओमा यांनी दिली.
साऊथ आफ्रिका सोसायटी आॅफ न्यूरोसर्जन्स व नागपूर न्यूरोलॉजिकल सोसायटी आॅफ इंडियाच्यावतीने आयोजित चार दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. जॉन ओमा सहभागी झाले आहेत. शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. ओमा म्हणाले, युरोप आणि अमेरिकन देशाच्या तुलनेत भारतात वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी आहे. प्रगत देशांच्या तुलनेत एवढेच दर्जेदार उपचार भारतातही उपलब्ध आहेत. यामुळे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे ‘मेडिकल हब’ होऊ शकतो. आफ्रिकेतील आरोग्यासंबंधित व्यवस्थेवर प्रकाश टाकताना डॉ. ओमा म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतील काही राष्ट्रे प्रगत आहेत तर त्यातुलनेत उत्तर खंडातील काही प्रदेश आजही मागास आहेत. देशासमोर एचआयव्ही हे सर्वात मोठे आव्हान आहे. एचआयव्हीबाधितांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने या रुग्णांमध्ये क्षयरोग व जंतूसंसर्गाचा धोका मोठा असतो. मात्र नुकत्याच झालेल्या एका पाहणीत एचआयव्हीबाधितांमध्ये पक्षाघात (स्ट्रोक), मिरगी, पार्किन्सन, स्मृतिभ्रंशासह मेंदूशी निगडित व्याधी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे, असेही ते म्हणाले.
सात लाख लोकसंख्यामागे एक न्यूरो सर्जन-डॉ. सुरेश नायर
न्यूरोलॉजिकल सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सुरेश नायर म्हणाले, जगाची लोकसंख्या ७.६ अब्ज आहे. त्यातुलनेत ३३ हजार न्यूरो सर्जन उपलब्ध आहेत. भारताची लोकसंख्या १.४ अब्ज असून, केवळ दोन २ हजार न्यूरो सर्जन आहेत. यामुळे रुग्ण व न्यूरो सर्जनमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील ही स्थिती खूपच दयनीय आहे. आफ्रिका खंडातील आठ देशाला एक न्यूरोसर्जन हे प्रमाण आहे. काही देशांत तर ‘ब्रेन ट्युमर’साठी न्यूरो सर्जनने तपासणी करणे ही अत्यंत श्रीमंत बाब समजली जाते. याउलट पाश्चिमात्य देशांमध्ये न्यूरो स्पेशालिटची संख्या तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात समाधानकारक आहे. तिथे अधिक संशोधन होत असून, विशिष्ट समस्यांवर बारकाईने लक्ष केंद्रित केले जात आहे.‘स्पेशलायझेन’वर अधिक भर दिला जात आहे, असेही ते म्हणाले.