कॅन्सरच्या ट्रीटमेंटनंतर उद्भवू शकतो लिम्फेडिमाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:43 AM2018-01-31T11:43:46+5:302018-01-31T11:45:54+5:30

कॅन्सरचा उपचार केल्यानंतर आपण सर्व धोक्याच्या पार झालो, असे वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. या ट्रीटमेंटनंतरही रुग्णाला लिम्फेडिमा होण्याचा धोका कायम असतो.

The risk of lymphadema can occur after the treatment of cancer | कॅन्सरच्या ट्रीटमेंटनंतर उद्भवू शकतो लिम्फेडिमाचा धोका

कॅन्सरच्या ट्रीटमेंटनंतर उद्भवू शकतो लिम्फेडिमाचा धोका

Next
ठळक मुद्देजगात १४० दशलक्ष प्रभावितनियंत्रणातून सामान्य आयुष्य जगणे शक्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कॅन्सरचा उपचार केल्यानंतर आपण सर्व धोक्याच्या पार झालो, असे वाटत असेल तर तो भ्रम ठरेल. या ट्रीटमेंटनंतरही रुग्णाला लिम्फेडिमा होण्याचा धोका कायम असतो. लिम्फा(लसिका)च्या संतुलनात बिघाड होऊन लिम्फेडिमाची स्थिती निर्माण होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात १४० ते १५० दशलक्ष लिम्फेडिमाच्या विळख्यात सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे यातील ४० ते ५० टक्के प्रमाण भारतात आहे. यावर उपचार करणे शक्य नाही. मात्र आधुनिक उपचार पद्धतीने यावर नियंत्रण ठेवून सामान्य आयुष्य जगता येऊ शकते. मात्र यासाठी कायम जागरूक असणे आवश्यक आहे.
प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व लिम्फे डिमा थेरेपिस्ट डॉ. रोहिणी पाटील यांनी लिम्फेडिमाबाबत जागृतीचे अभियान चालविले आहे. त्यांनी दिलेल्या वैद्यकीय माहितीनुसार लिम्फेडिमा हा शरीराच्या विशिष्ट भागात सूज येण्याची असामान्य स्थिती निर्माण करणारा आजार आहे. रक्ताऐवजी शरीरामध्ये तरल पदार्थ वहन करणाऱ्या लिम्फ ग्रंथीं(लसिका)मध्ये असंतुलन आल्यास ही सूज येते. सामान्यपणे असा प्रकार होऊ शकतो. मात्र कॅन्सरचे निदान करताना लसिका ग्रंथीची शल्यक्रिया किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट करण्यासाठी रेडिओथेरेपी, किमोथेरेपी केल्याने या लसिका ग्रंथीमध्ये असंतुलन निर्माण होते. यामुळे तरल पदार्थ प्रवाहित होण्यास बाधा निर्माण होते. ही शक्यता ट्रीटमेंटनंतर ५० ते ६० टक्के अधिक असते व कॅन्सर रुग्णांना आयुष्यभर हा धोका कधीही होण्याची शक्यता असते.
ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार घेतलेल्या रुग्णाला हात, छाती व पोटाच्या भागात लिम्फेडिमा होण्याची शक्यता असते, तर प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांना पाय व पोटावर होण्याची शक्यता असते.
प्राथमिकस्तरावर हात किंवा पायाला सूज येते. कपडे टाईट होतात. ही सूज असामान्य असते व शरीराच्या प्रभावित भागाला कडकपणा येतो. ही सूज उत्तरोत्तर वाढत जाते. सुजलेल्या ठिकाणी खाज येणे, हालचाल करण्यास व झोपण्यास त्रास होतो. उपचार न घेतल्यास सुजलेल्या भागातून द्रव बाहेर पडते व त्यावर इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
कॅन्सरचा उपचार केल्यानंतरही लिम्फेडिमा होणे हा त्या व्यक्तीवर शारीरिक आणि मानसिक आघात करणारा असतो. कॅन्सर रुग्णाला हा आयुष्यात कधीही उद््भवू शकतो व यावर उपचार शक्य नाही. मात्र लवकर निदान झाल्यास लिम्फेडिमाला नियंत्रित ठेवून सामान्य आयुष्य जगणे शक्य आहे.

काय आहे लिम्फेडिमा?
लिम्फेडिमा हा शरीराच्या विशिष्ट भागावर असामान्य सूज येण्याचा प्रकार आहे. माणसाच्या शरीरात रक्ताप्रमाणेच लिम्फ किंवा लसिका नामक ग्रंथी असते, जी प्रोटिन, फॅट्स व इतर तरल पदार्थ शरीरात प्रवाहित करण्यास मदत करते. एखादे संक्रमण, कॅन्सरची स्थिती किंवा कॅन्सरच्या उपचारासाठी होणाऱ्या शस्त्रक्रिया व विकिरणामुळे या ग्रंथीला आघात निर्माण होतो. त्यामुळे तरल पदार्थ प्रवाहित होण्यास बाधा निर्माण होते व शरीराच्या विशिष्ट भागात सूज येते. लिम्फेडिमाची सूज इतर सुजेप्रमाणे सामान्य नसते. यात कडकपणा येतो व हालचाल करणे कठीण होते. यामुळे चेहरा किंवा सूज आलेला शरीराचा भाग विकृत दिसायला लागतो. ही सूज वाढत जाते व उपचार न घेतल्यास फुटून द्रव बाहेर येते.

लिम्फेडिमावर प्रभावी सीडीटी उपचार
डॉ. रोहिणी पाटील यांनी सांगितले, लिम्फेडिमावर नियंत्रणासाठी जनजागृती हा सर्वोत्तम पर्याय आहे. यापूर्वी मालिश आणि औषधोपचाराद्वारे हे नियंत्रित केले जात होते. मात्र आधुनिक तंत्राद्वारे उपचार सोपे झाले आहेत. कम्प्लीट डिकन्जेस्टीव्ह थेरेपी(सीडीटी)मुळे लिम्फेडिमावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. याशिवाय व्हॅस्क्युलर लिम्फ नोड ट्रान्सफर (व्हीएलएनटी) व इतर काही उपचार पद्धतीही विकसित झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील पहिल्या लिम्फेडिमा थेरेपिस्ट
स्त्रीरोग व कॅन्सर तज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी अमेरिकेच्या मान्यताप्राप्त आरोग्य संस्थेच्यावतीने लिम्फेडिमा थेरेपिस्ट म्हणून पदवी संपादन केली आहे. ही पदवी संपादन करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. स्नेहांचलमध्ये कॅन्सर रुग्णांच्या सेवेत राहणाऱ्या डॉ. पाटील यांनी या अभ्यासातून लिम्फेडिमाची गंभीरता जाणून घेतली. ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती अभियानासाठी दिवसरात्र एक करणाऱ्या डॉ. रोहिणी यांनी लिम्फेडिमाबाबत जनजागृती अभियान राबविण्याचा मनोदय लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

Web Title: The risk of lymphadema can occur after the treatment of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.