भारतातील बालकांमध्ये जन्मत:च लठ्ठपणाचा धोका
By सुमेध वाघमार | Published: December 2, 2023 07:15 PM2023-12-02T19:15:01+5:302023-12-02T19:15:22+5:30
पाश्चिमात्य देशात जन्मत: फॅटचे प्रमाण १२ टक्के तर भारतात २५ टक्के प्रमाण आहे.
नागपूर : पाश्चिमात्य देशातील बालकांमध्ये जन्मत: फॅटचे प्रमाण जवळपास १२ टक्के असते, याच्या दुप्पट भारतातील बालकांमध्ये हे प्रमाण २५ टक्के असते. यामुळे लहानपणापासूनच योग्य जीवनशैली, आहार व व्यायाम महत्त्वाचा ठरतो, अशी माहिती दिल्ली येथील डॉ. अमित गुप्ता यांनी दिली.
ऑल इंडिया असोसिएशन फॉर अॅडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटी, डायबेटिक केअर फाउंडेशन आॅफ इंडिया, अकादमी आॅफ मेडिकल सायन्सेस, डायबेटिक असोसिएशन आॅफ इंडिया व इंडियन डायबेटिक असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ओबेसिटी इंडिया-२०२३’ परिषदेत डॉ. गुप्ता सहाभागी झाले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते.
-विसरल फॅट ठरतोय धोकादायक
डॉ. गुप्ता म्हणाले, ‘विसरल फॅट’ आणि ‘सबक्युटेनिअस फॅट’ असे फॅटचे दोन प्रकार असतात. ‘विसरल फॅट’ हे अवयवांना वेटोळे घालून असतात तर ‘सबक्युटेनिअस’, म्हणजे त्वचेला लागून असलेले फॅट वाढतात. ‘विसरल फॅट’ हे अधिक धोकादायक असतात. हे ‘फॅट’ कमी करण्यासाठी योग्य व्यायाम महत्त्वाचा ठरतो. यामुळे ‘विसरल फॅट’ कमी होऊन रक्तदाब, थायरॉइड, मधुमेह, एकूणच इन्सुलिन प्रतिरोधकचा धोका कमी होतो.
-आठवड्याला १५० मिनिटांचा व्यायाम आवश्यक
दर आठवड्याला जवळपास १५० मिनिटांचा व्यायाम आवश्यक आहे. यात साधे चालणे अपेक्षित नाही. तर घाम येईल, हार्ट बीट वाढतील उदा. स्विमिंग, सायकलिंग, अॅरोबिक व्यायाम महत्त्वाचे ठरतात. सोबतच आठवड्यातून तीन दिवस साधारण १५ मिनिटेतरी ‘मसल्स स्ट्रेन’ असणारे व्यायाम करणे गरजेचे असल्याचे डॉ. गुप्ता म्हणाले.
-जन्मत: कमी, अधिक वजनामुळेही लठ्ठपणाची जोखीम
डॉ. प्रिती पटाले म्हणाल्या, जन्मत: बाळाचे वजन २.७५ ग्रॅमपेक्षा कमी असेल किंवा ३.१ ग्रॅमपेक्षा अधिक असेल तर पुढे लठ्ठपणाची जोखीम वाढते. गर्भावस्थेच्या दरम्यान महिला लठ्ठ असल्यास होणारे बाळही लठ्ठ होण्याची शक्यता असते.
-२०३५ पर्यंत ५० टक्के लोकसंख्या लठ्ठपणाचा विळख्यात
डॉ. पटोले म्हणाल्या, लठ्ठपणाला गंभीरतेने न घेतल्यास २०३५ पर्यंत ५० टक्के लोकसंख्या लठ्ठपणाचा विळख्यात येईल. यात मुलींमध्ये लठ्ठपणा वाढण्याचा दर हा १२५ टक्के तर मुलांमध्ये हा दर १०० टक्के राहण्याची शक्यता आहे. कोरोनांनंतर विशेषत: शाळेकरी मुलांमध्ये लठ्ठपणा वाढल्याचे दिसून येत आहे.
-तपकिरी चरबीपेक्षा पांढरी चरबी धोकादायक
शरीरातील तपकिरी चरबीपेक्षा पांढरी चरबी अधिक धोकादायक असल्याचे हेद्राबाद येथील डॉ. राकेश सहाय यांनी सांगितले, ते म्हणाले, लठ्ठपणामुळे खूप जास्त पांढरी चरबी तयार होते. यामुळे विविध आजाराचा धोका वाढतो. त्या तुलनेत तपकिरी चरबी लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर चयापचय विकारांवर उपचार करण्यासाठी काम करते. पांढरी चरबी कमी करण्यासाठी योग्य आहार व नियमीत व्यायाम हाच पर्याय आहे.
-७० टक्के मुले प्रौढ वयात लठ्ठ
‘एआयएआरओ’चे आयोजक अध्यक्ष नागपूरचे डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, लठ्ठपणा हा मधुमेह उच्च रक्तदाब, कोरोनरी धमनी रोग, गाउट, स्लीप अॅपनिया, संधिवात, पित्ताशयावरील दगड, वंध्यत्व आदी रोगांची जननी आहे. लहानपणी जी मुले लठ्ठ असतात त्यातील जवळपास ७० टक्के मुलांमध्ये प्रौढ वयातही लठ्ठपणा असतो. बैठी जीवनशैली, शारीरिक निष्क्रियता आणि अयोग्य आहार यामुळे पोटातील लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.