नागपूर विभागात कपाशीला गुलाबी बोंडअळीचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:04 AM2020-02-11T11:04:17+5:302020-02-11T11:04:36+5:30
२०१९ मध्ये नागपूर विभागात ६ लाख ७१ हजार क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. कापूस पिकावर मागील वर्षीच्या तुलनेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला असला तरी या किडीचे समूळ उच्चाटन झालेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून, खरीप हंगाम २०१९ मध्ये नागपूर विभागात ६ लाख ७१ हजार क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. कापूस पिकावर मागील वर्षीच्या तुलनेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला असला तरी या किडीचे समूळ उच्चाटन झालेले नाही. या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे, अन्यथा ही कीड शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकते, असे विभागीय कृषी सहसंचालक आर. जे. भोसले यांनी म्हटले आहे.
गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असून, कापूस उत्पादनातील सर्व यंत्रणा जसे शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कापूस पीक संशोधन संस्था, बियाणे उत्पादक कंपन्या, कीटकनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्रे (मार्केट यार्ड), गोडाऊन, जिनिंग, प्रेसिंग मिल्स इत्यादी संस्थांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही भोसले यांनी म्हटले आहे.
या किडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या श्रेडर, रोटावेटर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास तसेच गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल.
पाच ते सहा महिने कापूसविरहित शेत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्टात येते. त्यामुळे पुढील हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. कपाशीचा हंगाम संपण्याच्या वेळी शेतातील कीड रोगग्रस्त पाने, पाते, फुले, बोंडामध्ये असलेल्या बोंडअळीच्या विविध अवस्था नष्ट करण्यासाठी शेतात शेळ्या, मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत.
पऱ्हाटी काढल्यानंतर शक्यतो दिवसाच नांगरणी करण्याचा सल्ला
कपाशीच्या पऱ्हाट्यामध्ये किडीची सुप्त अवस्था राहत असल्याने त्याची गंजी करून बांधावर ठेवू नये. कपाशीच्या पऱ्हाट्या, व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पऱ्हाटी शेतातून काढल्यानंतर त्यांची साठवणूक न करता त्या कांडी कोळसा, इंधन ब्रिकेट्स तयार करणाऱ्या कारखान्यांना द्याव्यात. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरणी हिवाळ्यातच करावी. त्यामुळे जमिनीवर आलेल्या किडीचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. शक्यतो दिवसा नांगरणी केल्यास किडीचे नैसर्गिक शत्रू चिमण्या, कावळे, बगळे याद्वारे नियंत्रण होते.