नागपुरात कचरा संकलन कर्मचाऱ्यांना संक्रमणाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:54 PM2020-03-20T22:54:43+5:302020-03-20T22:56:18+5:30
मनपाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची रोटेशननुसार ड्यूटी लावली आहे. परंतु घरातील कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्याबाबतीत दूर्लक्ष केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणावर अंकुश लावण्यासाठी राज्य सरकार व जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. मनपाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची रोटेशननुसार ड्यूटी लावली आहे. परंतु घरातील कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्याबाबतीत दूर्लक्ष केले जात आहे. कचरा संकलन वाहनावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, हॅण्ड ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे. परंतु अनेक वाहनावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या तोंडाला मास्क व हातात ग्लोव्हज दिसत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरात कचरा संकलनासाठी शहरात दोन कंपन्या नियुक्त केल्या आहेत. यात झोन १ ते ५ ची जबाबदारी एजी एन्व्हायरो तसेच ६ ते १० झोन ची जबाबदारी बीव्हीजी कंपनीला दिली आहे. शहरात ५५० पेक्षा अधिक कचरा संकलन वाहने आहेत. एका वाहनावर ड्रायव्हर व एक सहायक असतो. कोरोनाच्या भीतीने कर्मचाऱ्यांना मास्क आणि ग्लोव्हज दिले आहे. मात्र वाहनावरील ड्रायव्हर व सहायकांकडून त्याचा उपयोग होताना दिसत नाही. काही वाहनावरील कर्मचारी आरोग्याची काळजी घेत सुरक्षा साधने उपयोगात आणत आहे. असे असले तरी ६० टक्के वाहनांवर कचरा संकलन करणारे सुरक्षा मानकांकडे दूर्लक्ष करीत आहे.
वाहनावरील तैनात कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ग्लोव्हज व मास्कची गुणवत्ता योग्य नाही. कचरा उचलताना ग्लोव्हज फाटतात. पुन्हा मागितल्यावर मिळत नाहीत. सुविधा तर सोडा वेतनसुद्धा वेळेवर मिळत नाही.
आऊटर वस्त्यांमध्ये एका दिवसानंतर येताहेत कचऱ्याच्या गाड्या
पूर्व, उत्तर व दक्षिण नागपूरच्या आऊटर वस्त्यांमध्ये एक दिवसांच्या अतरात कचरा संकलन करणारे वाहन येत आहे. मनपा प्रशासनाने दावा केला होता की रोज कचरा संकलन करणारे वाहन येईल. पूर्व नागपुरातील नसेमन सोसायटी, विकासानंद हाऊसिंग सोसायटी, विजयनगर, भरतवाडा रोडवरील वस्त्यांमध्ये एका दिवसानंतर कचऱ्याचे वाहन येत आहे. दररोज ओला व वाळला कचरा वेगवेगळा करणे सुरू केले आहे. उत्तर नागपुरातील यशोधरानगर, राणी दुर्गावतीनगर, ऑटोमोटिव्ह चौक येथे कचरागाड्या नियमित येत आहेत.