‘गाडी वाला आया घर से’ ने रुजविले स्वच्छतेचे संस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:02 AM2020-02-12T11:02:07+5:302020-02-12T11:02:53+5:30
‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे. जे आज प्रत्येक नागपूरकरांच्या ओठांवर आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत हे गाणे सतत वाजत असते आणि या गाण्याचा स्वर कानावर पडला रे पडला, सगळे ‘अलर्टमोड’मध्ये असतात.
प्रवीण खापरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गाढ झोपेत असलेल्यांना उठविणे हा अघोषित गुन्हाच! त्यात नागपूरकर तुर्रमखानच म्हणावे. नागपूरकरांच्या ठसकेबाज स्वभावाची ख्याती सर्वदूर आहे. अशी धास्ती असतानाही, नागपूरकरांना उठविण्याची किमया एकाने साधली आहे. या किमयागाराच्या प्रेमात संपूर्ण नागपूरकर आहेत. कारण आहे स्वच्छतेचा संदेश देणारे ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे. जे आज प्रत्येक नागपूरकरांच्या ओठांवर आहे.
सकाळपासून ते रात्रीपर्यंत हे गाणे सतत वाजत असते आणि या गाण्याचा स्वर कानावर पडला रे पडला, सगळे ‘अलर्टमोड’मध्ये असतात. भीतीने नव्हे तर कौतुकाने. महापालिकेचे स्वच्छतादूत गाडी घेऊन फिरतात आणि सोबतीला रेकॉर्डवर हे गाणे असते. या गाण्याची मोहिनीच बघा, स्वच्छतेचा संदेश देणारे हे गाणे आता लग्न समारंभात डीजेच्या तालावर वाजायला लागले आहे आणि त्यावर धम्माल डिस्कोही व्हायला लागले आहे. नागपूरकरांच्या पसंतीस उतरलेल्या या गीताचे रचनाकार व गायक मध्य प्रदेशातील मंडला येथील रहिवासी श्याम बैरागी आहेत. या गीताची मोहिनी आज सबंध देशाला पडली असून, जगभरातील २२ देशातून ऐकले-वाजवले जात आहे. पेशाने ते प्राथमिक शाळेतील शिक्षक आहेत आणि मुलांना पुस्तकी ज्ञानासोबतच स्वच्छतेचे संस्कारही देतात. ज्याप्रमाणे मुरलीधराने फुंकलेल्या स्वराने संपूर्ण दुनिया मोहित झाली अगदी तशीच मोहिनी या किमयागाराने नागपूरकरांवर टाकली आहे आणि त्याचे नावही श्यामच आहे. सोबतच हृदयाने कवी असल्याने, वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर गीत लेखनही करीत असतात. २०१६ मध्ये १५ आॅगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण देताना स्वच्छतेचे आवाहन केले आणि मी या मुद्याने प्रभावित झाल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार मंडला नगर परिषदेकडून मला स्वच्छतेवर एक गीत लिहिण्यास सांगण्यात आले आणि स्वच्छतेचा जागर करणाऱ्या ‘गाडी वाला आया घर से कचरा निकाल’ या ओळी मेंदूत तरळायला लागल्या. त्यानंतर हे गाणे ‘स्याही दिल की डायरी’ या माझ्या युट्यूब चॅनलवर उपलोड केले आणि बघता बघता हे गाणे इतके हिट झाले की भारतासह २२ देशातून हे गाणे ऐकले-वाजवले जात असल्याचे बैरागी म्हणाले. मंडला नगर परिषदेनंतर खंडवा जिल्ह्यातील इतर चार नगर परिषदांनीही स्वच्छता अभियानासाठी हेच गाणे निश्चित केले. मग मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा सरकारने या गाण्याची निवड त्यांच्या त्यांच्या राज्यात व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांना मनोरंजनात्मक शैलीत स्वच्छता अभियानाशी जोडण्यासाठी केली. आज हे गाणे देशातील सर्व नागरिकांच्या ओठांवर आहे, यापेक्षा दुसरा आनंद नसल्याचे ते सांगतात.
प्लास्टिक, कचरा, पर्यावरण
श्याम बैरागी यांनी ‘गाडी वाला’ या गाण्यासोबतच ‘प्लास्टिक टाटा टाटा, प्लास्टिक बाय’ आणि इतर पर्यावरण संवर्धनावर रचना लिहिल्या आहेत आणि स्वत:च ते गायलेही आहेत. या गाण्यांची धूम छत्तीसगडमध्ये आहे. विशेष म्हणजे ‘गाडीवाला’ या गाण्याचे अनेक व्हर्जन्स निघत आहेत. घाणीच्या साम्राज्यातून देशाला मुक्त करणाºया या अभियानात माझे हे छोटेसे योगदान मला आनंद प्रदान करणारे असल्याचे श्याम बैरागी सांगतात.
सरकारच्या योजनांची गीतमाला करणार - श्याम बैरागी
केंद्र असो वा राज्य, मला सरकारकडून अपेक्षा आहे. सरकारच्या ज्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या योजनांना गीत रूपात लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य आहे, हे ‘गाडी वाला’ या गाण्याने सिद्ध केले. सध्या पर्यावरण आणि वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर गीत लेखन करून ठेवले आहे आणि माझ्या आर्थिक स्थितीनुसार त्यांचे रेकॉर्डिंगही करीत आहे. सरकारने मदत केली तर या कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाईल, अशी भावना श्याम बैरागी यांनी व्यक्त केली.
नागपूर करेल का सन्मान?
श्याम बैरागी यांच्या गीताचा उपयोग देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकारे करत आहेत. मात्र, त्या मोबदल्यात त्यांना अद्याप काहीही प्राप्त झालेले नाही. मंडलासारख्या आदिवासी क्षेत्रात असल्यामुळे, त्यांची पोहोचही नाही. मधल्या काळात मंडलाच्या नगर परिषदेने त्यांचा सत्कार केला व मानधन देण्याचे मान्यही केले. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही. नागपुरात स्वच्छता अभियानाला वेगळ्या वळणावर घेऊन जाणाºया या गीतकाराला नागपूर महानगरपालिकेने सन्मानित करणे व मानधन देणे गरजेचे आहे.