कोट्यवधींच्या फसवणुकीतील रितेश गोयल तुरुंगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 10:30 PM2019-10-09T22:30:34+5:302019-10-09T22:31:48+5:30
कोट्यवधींच्या फसवणुकीत ट्रॅव्हल्स व्यापारी रितेश गोयलला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. रितेश तुरुंगात गेल्यामुळे प्रकरणातील इतर आरोपीत खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोट्यवधींच्या फसवणुकीत ट्रॅव्हल्स व्यापारी रितेश गोयलला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. रितेश तुरुंगात गेल्यामुळे प्रकरणातील इतर आरोपीत खळबळ उडाली आहे. आर्थिक शाखा या प्रकरणातील हव्या असलेल्या आरोपींवर काय कारवाई करते याकडे तक्रारकर्त्याचे लक्ष लागले आहे.
ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ३.९० कोटीची फसवणूक करणाऱ्या आरोपी रितेश गोयलला अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी त्याचा भाऊ देवेंद्रला जबलपूरच्या तुरुंगातून वॉरंटवर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. ३ ऑक्टोबरला जमानत झाल्यामुळे देवेंद्रला जबलपूरच्या तुरुंगात पाठविण्यात आले. त्यानंतर रितेशला अटक करण्यात आली. आज रितेशला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने त्यास तुरुंगात पाठविले. या प्रकरणात पोलिसांना निकिता गोयल, गोविंद गोयल आणि आणि अनिता गोयल हे हवे आहेत. त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे पोलिसांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. रितेश तुरुंगात गेल्यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनुसार पोलिसांच्या संशयास्पद कामगिरीमुळे प्रकरणातील सत्यता बाहेर येत नाही. नागपूर, जबलपूर आणि रायपूरचे अनेक सट्टेबाज आरोपींशी जुळलेले आहेत. सट्टेबाजांनी कोट्यवधीची गुंतवणूक केली आहे. त्यांनाही तक्रारकर्ता कोळसा व्यापारी संदीप अग्रवाल यांच्याप्रमाणे ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. ते सुद्धा बराच कालावधीपासून वसुलीसाठी मागे लागले होते. अग्रवाल यांनी तक्रार केल्यामुळे काळ्या धनाचा भंडाफोड होण्याच्या भीतीने ते भूमिगत झाले आहेत. बारकाईने तपास केल्यास प्रकरणातील सत्यता बाहेर येऊ शकते. आरोपींना त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्याची पूर्वीच माहिती होती. जबलपूर पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे देवेंद्रला पोलिसांशी व्यवहार कसा करायचा हे माहीत होते. त्यामुळे आर्थिक शाखा आठवडा होऊनही आरोपींकडून ठोस माहिती मिळवू शकली नाही.
युवतीची भूमिका महत्त्वाची
सूत्रांनुसार या प्रकरणात आरोपींकडे काम करणाऱ्या एका युवतीची महत्त्वाची भूमिका आहे. ती बऱ्याच काळापासून आरोपींकडे काम करत असून गोयल बंधूंचा तिच्यावर विश्वास आहे. तिला गोयल बंधूंच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती आहे. प्रकरणाची पोलीस तक्रार झाल्यामुळे ती सतर्क झाली होती. गोयल बंधूंच्या अटकेनंतर स्वत:च्या बचावासाठी प्रयत्न करीत आहे. तिची चौकशी केल्यास धक्कादायक बाबींचा खुलासा होऊ शकतो.