नद्या सफाईची कामे मे महिन्यात : मनपा आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:01 AM2019-04-05T01:01:23+5:302019-04-05T01:02:48+5:30
मागील वर्षी पहिल्या पावसात शहरातील ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. आवश्यक ती डागडुजी करा. मशीन आणि कर्मचारी सज्ज ठेवा. शहरातील वस्त्यांमधील नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. त्यात खंड न पडू देता युद्धपातळीवर सुरू ठेवा आणि नाग नदी, पिवळी नदी तसेच पोहरा नदी स्वच्छता अभियान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसहभागातून सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गुरुवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील वर्षी पहिल्या पावसात शहरातील ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. आवश्यक ती डागडुजी करा. मशीन आणि कर्मचारी सज्ज ठेवा. शहरातील वस्त्यांमधील नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. त्यात खंड न पडू देता युद्धपातळीवर सुरू ठेवा आणि नाग नदी, पिवळी नदी तसेच पोहरा नदी स्वच्छता अभियान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसहभागातून सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तअभिजित बांगर यांनी गुरुवारी दिले.
महापालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित पावसाळापूर्व नदी स्वच्छता आढावा बैठकीत ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त अझीझ शेख, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह सर्व झोनचे कार्यकारी अभियंता, सहायक आयुक्त व विभागप्रमुख उपस्थित होते.
गेल्या वर्षीच्या पावसात शहरातील ज्या-ज्या वस्त्यांमध्ये व भागात पाणी साचले होते, त्या ठिकाणची आताची परिस्थिती काय, याचा आढावा झोन सहायक आयुक्तांकडून घेतला. जी कामे अद्यापही अपूर्ण आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले. नरेंद्र नगर येथील रेल्वे अंडर ब्रिजमध्ये पाणी साचले तर त्यासाठी मोटर पंप आणि पाणी फेकणाऱ्या मशीन सज्ज ठेवण्यात याव्या, ज्यांची दुकाने, घरे बेसमेंट मध्ये आहेत त्यांना तातडीने नोटीस बजावून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे, रेल्वे विभागासोबत समन्वय साधून त्यांच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या, आयआरडीपीच्या नाल्या स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या.गेल्या वर्षी सफाई अभियानाबाबत वेळीच निर्णय झाले नव्हते. याची दखल घेऊन नियोजन करण्याची सूचना कौस्तुभ चॅटर्जी यांनी केली.
सीएसआर फंडातून कामे करण्यासाठी पत्र
शहरातील मॉईल, वेकोलि व अशा अनेक कंपन्यांना पत्र पाठवून त्यांच्या सीएसआर फंडातून नदी, नाले स्वच्छता करण्यासाठी पत्र पाठविण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. नाले साफ, सफाई अभियानाचे संपूर्ण समन्वयन झोन स्तरावर सहायक आयुक्तांनी करावे, असे निर्देश दिले. नदी स्वच्छता अभियानात नागपूर सुधार प्रन्यास, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग या संस्थाही सहभागी होणार आहेत. लवकरच सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांच्या अधिकारी, प्रतिनिधींची बैठक घेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या मोहिमेत शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही सहभागी होण्याचे आवाहन अभिजित बांगर यांनी यावेळी केले.
वस्त्यांतील नाल्यांची सफाई सुरू
शहरातील अनेक भागांतून लहान-मोठे नाले वाहतात पुढे ते नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीला मिळतात. या नाल्यांची सफाई झोन स्तरावरून सुरू करण्यात आली आहे. नद्यांची स्वच्छता लोकसहभागातून करण्यात येणार असून त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.