नदी स्वच्छता अभियानाला अंबाझरी येथून सुरुवात
By गणेश हुड | Published: January 2, 2024 02:18 PM2024-01-02T14:18:58+5:302024-01-02T14:19:10+5:30
लोकमत न्यूज नटवर्क नागपूर : महापालिकेतर्फे दरवर्षी उन्हाळ्यात नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. मात्र, यावर्षी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ...
लोकमत न्यूज नटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे दरवर्षी उन्हाळ्यात नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. मात्र, यावर्षी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या अभियानाला अंबाझरी घाटापासून सुरुवात करण्यात आली आहे. येथील नाग नदीच्या पात्रातील गाळ व कचरा काढण्यात आला. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी यावर्षी १ जानेवारीपासून नदी स्वच्छता अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही मोहीम राबविली जात आहे.
नाग नदीची लांबी १७.७५ किमी, पिवळी नदीची लांबी १७ किमी आणि पोहरा नदीची लांबी १२ किमी आहे. या तिन्ही नद्यांची स्वच्छता केली जाणार आहे. नदी स्वच्छतेदरम्यान नद्यांतून काढण्यात येणारा गाळ, माती तशीच पडून राहणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. नदीतून काढण्यात येणाऱ्या मातीचा उपयोग वृक्ष लागवडीसाठी केला जाणार आहे.
गाळ काढताना नदी व नाल्यांमधील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी दिले आहेत.