राज्यातील नदी महोत्सवाचा वर्ध्यातून होणार शुभारंभ; गांधी जयंतीचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 07:29 PM2022-09-20T19:29:22+5:302022-09-20T19:30:00+5:30
Nagpur News भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
वर्धा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा शुभारंभ २ ऑक्टोबरला वर्धा येथून होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप वर्धा येथे होणार असून, या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याचवेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून नदी महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या आढाव्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे आदी उपस्थित होते.
प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी
राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करताना जलबिरादरी संस्थेच्या विशेष नैपुण्याची मदत घेतली जाणार आहे. देश विदेशात जलतज्ज्ञ म्हणून परिचित असलेले डॉ. राजेंद्र सिंह यांची मदत यासाठी घेतली जाणार असून शासनाचे जलसंपदा, जलसंधारण, वन इत्यादी विभाग यामध्ये जोडले जाणार आहेत. नदी संरक्षण आणि संवर्धनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग काम करणार असून सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्रातील ७५ नद्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. हे नोडल अधिकारी संबंधित नदीच्या विकासासाठी, पुनरुज्जीवनासाठी काम करतील. नदी यात्रेच्या माध्यमातून नद्यांचे आयुष्य चांगले कसे राहील, नदी ही अमृतवाहिनी कशी आहे, छोट्या नद्या पुनरुज्जीवित केल्या तर त्याचा कसा फायदा होईल याबाबतची माहिती नदी यात्रेच्या दरम्यान देण्यात येईल, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.