नागपुरात नदी स्वच्छता अभियान सुरू :पहिल्यांदाच मार्चमध्ये सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:07 AM2020-03-29T00:07:51+5:302020-03-29T00:10:37+5:30
‘कोरोना’मुळे शहरात असलेल्या ‘लॉकडाऊन’चा फायदा घेत नदी स्वच्छता अभियानाच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्च महिन्यात अभियानाला सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे शहरात असलेल्या ‘लॉकडाऊन’चा फायदा घेत नदी स्वच्छता अभियानाच्या इतिहासात पहिल्यांदाच मार्च महिन्यात अभियानाला सुरुवात झाली आहे. पंचशील चौक येथे असलेल्या नाग नदीतून या अभियानाला शनिवारी २८ मार्चपासून सुरुवात झाली. विशेष म्हणजे, नदी स्वच्छता अभियानासाठी आवश्यक सर्व यंत्रसामुग्रीची सोय करीत, पुढील २० दिवसात तीनही नद्यांची स्वच्छता पूर्ण करावी, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
नदी स्वच्छता अभियानात नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी या तीन नद्यांची स्वच्छता होणार आहे. नाग नदीचा १७ किलोमीटरचा स्ट्रेच असून, पाच भागात त्याची विभागणी करण्यात आली आहे. पिवळी नदीची चार भागात तर पोरा नदीची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या आणि कामाच्या दृष्टीने ही विभागणी असून, प्रत्येक विभागाची जबाबदारी स्वतंत्र अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. स्वच्छता करण्यात येणाऱ्या तीनही नद्यांची लांबी एकूण ४८ कि.मी. आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात संपूर्ण अभियानाचे प्रमुख म्हणून तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता श्वेता बॅनजी आणि यांत्रिकी अभियंता उज्ज्वल लांजेवार हे नदी स्वच्छता अभियानाचे समन्वयन करतील.
शनिवारी नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, पंचशील चौक ते अंबाझरी या नाग नदीच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे नदीचा प्रवाह सुरळीत व्हावा, यासाठी नदीतून घाण, कचरा आणि गाळ काढण्यात येणार आहे. हा संपूर्ण कचरा, गाळ नदीच्या बाजूलाच न ठेवता इतरत्र टाकण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. यापूर्वी अगदी पावसाळ्याच्या तोंडावर नदी स्वच्छता होत होती आणि नदीकाठावरच गाळ टाकला जायचा. येणाºया पावसामुळे संपूर्ण गाळ पुन्हा नदीत जायचा आणि नदीकाठावरील घरात पावसाचे पाणी शिरायचे. आता नदी स्वच्छता अभियानाचे मार्च महिन्यातच काम सुरू झाल्याने संभावित सर्व धोके टाळण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.