महिनाभर राबविणार नदी स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 08:45 PM2019-04-16T20:45:12+5:302019-04-16T20:47:06+5:30
महापालिका शहरातील नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीचे स्वच्छता अभियान ४ मे ते ५ जून दरम्यान राबविणार आहे, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात आयोजित नदी स्वच्छता अभियान आढावा बैठकीत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महापालिका शहरातील नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीचे स्वच्छता अभियान ४ मे ते ५ जून दरम्यान राबविणार आहे, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात आयोजित नदी स्वच्छता अभियान आढावा बैठकीत दिली.
शहराचे वैभव असलेल्या नागनदीची अवस्था चांगली नाही. पिवळी व पोहरा नदीचीही अशीच अवस्था आहे. याचा विचार करता स्वच्छतेसाठी नागरिकांसह शासकीय, निमशासकीय, खासगी व सेवाभावी संस्थांनी पुढे यावे. नदी स्वच्छता अभियान आपली स्वत: जबाबदारी आहे असे समजून महापालिकेला सहकार्य करा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी केले.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इस्राईल, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता ए.जी. नागदिवे, राजेश भूतकर, अमीन अख्तर, विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, वेकोलिचे बी.टी. रामटेके, ग्रीन व्हीजीलचे कौस्तुभ चॅटर्जी, क्रेडाईचे गौरव अग्रवाल, एसएमएस इन्ड्यूरन्स लिमिटेडचे डॉ. किशोर मालवीय, विश्वराज इन्फ्रास्टक्चरचे श्रीकांत समरूतवार, महामेट्रोचे जयप्रकाश गुप्ता, मो. शफीक, एनएचएआय पीआययूझेडचे स्वप्निल कसार, राजन पाली, डी.पी. वर्मा, एमआयडीसीचे के.टी. बोंद्रे, राहुल तिडके, मंगल कार्यालय असोसिएशनचे संजय काळे, विजय तलमले, कनक रिसोर्सेस मॅनेजमेंटचे कमलेश शर्मा, कुशाल विज, नासुप्रचे मनोहर जीवनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जी.डी. जिद्देवार, हल्दीराम समूहाचे दीपक पांडे, यशपाल धीमान उपस्थित होते.
५ मे पासून शहरातील नद्या स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या शहरातील वैभव असलेल्या या नद्यांची स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे नदी घाण होऊ नये यासाठी काळजी घेणेही आपले कर्तव्य आहे. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच महिनाभरात या तिन्ही नद्यांची स्वच्छता होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्थांसह खासगी संस्थांनी दरवर्षी प्रमाणेच यावेळीही स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी आयुक्त अभिजित बांगर यांनी केले.
तिन्ही नद्यांची एकूण ४८ किमी पर्यंत स्वच्छता करण्यात येणार आहे. यासाठी महिनाभर पोकलेन, जेसीबी, टिप्पर अशा साधनांची अत्यंत गरज भासणार आहे. शहरातील मोठ्या संस्थांनी ही साधने प्रायोजित करण्यासाठी सहकार्य करावे. संस्थांकडून किती साधने प्रायोजित करण्यात येणार आहेत याबाबत योग्य नियोजन करून त्याची माहिती लवकरात लवकर मनपा प्रशासनाला देण्याचेही आवाहन आयुक्तांनी केले.
पिवळी नदीची जबाबदारी नासुप्रकडे
महापालिका नागनदी व पोहरा नदी स्वच्छता अभियान राबविणार आहे. पिवळी नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी नासुप्रवर सोपविण्यात आली. खासगी संस्थांनीही तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा. खासगी संस्थांकडून पुरविण्यात येणाऱ्या साधनांसाठी लाणारे इंधन नागपूर महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त संस्थांनी नदी स्वच्छता अभियानात सहभागी होऊ न सहकार्य करण्याचे आवाहन अभिजित बांगर यांनी केले.