नागपुरात लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान : रविवारपासून शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 08:39 PM2019-05-04T20:39:15+5:302019-05-04T20:40:24+5:30
महापालिकेतर्फे शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला उद्या रविवारी सुरुवात होत आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात असून ५जूनपर्यंत हे अभियान चालणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतर्फे शहरातील नागनदी, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियानाला उद्या रविवारी सुरुवात होत आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जात असून ५जूनपर्यंत हे अभियान चालणार आहे.
आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार संपूर्ण अभियानाचे समन्वयन आणि संनियंत्रणाची जबाबदारी मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याकडे नाग नदी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांच्याकडे पिवळी नदी तर उपायुक्त राजेश मोहिते यांच्याकडे पोरा नदी स्वच्छता अभियानाची जबाबदारी राहणार आहे. या व्यतिरिक्त अन्य अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत.
शहरातील नद्यांच्या स्वच्छतेकरिता एकूण १० एक्झिक्युटिव्ह ग्रुप तयार करण्यात आले असन त्यात कार्यकारी अभियंता हे चमूप्रमुख असतील. या ग्रुपमध्ये सहायक आयुक्त तथा वॉर्ड अधिकारी, उपअभियंता, झोन स्तरावरील आरोग्य अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पोरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ रविवारी सकाळी ७ वाजता सहकार नगर घाटाजवळ, नाग नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सकाळी ८ वाजता संगम चाळ येथे तर सकाळी ९ वाजता नारा घाट येथे पिवळी नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ होईल. या अभियानात यंत्रणेसोबतच लोकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन अभिजित बांगर यांनी केले आहे.