नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे नदीतील पाणी दूषित होऊ नये : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 12:23 AM2021-03-09T00:23:00+5:302021-03-09T00:25:14+5:30
River water should not be polluted शहरातील सांडपाण्यामुळे नदी, नाले दूषित होऊ नयेत, यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. त्यामुळे सर्वांना शुद्ध पाणी मिळू शकेल, यासंदर्भात प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सांडपाण्यामुळे नदी, नाले दूषित होऊ नयेत, यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. त्यामुळे सर्वांना शुद्ध पाणी मिळू शकेल, यासंदर्भात प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नीरी येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार व त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ तसेच जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
शहरातील नागरिकांसाठी नागनदीच्या पाण्याचा उपयोग करून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे दूषित भाजीपाला उत्पादित होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. या दूषित पाण्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम होणार नाही, याबाबत शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांनी चर्चा करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
कामठी व कन्हान येथील जलशुध्दीकरणाच्या कामास प्राधान्य देऊन त्या क्षेत्राची शास्त्रज्ञांमार्फत पाहणी करावी तसेच या विषयावर सखोल चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या दोन्ही क्षेत्राच्या पाहणीचे व्हिडिओ बनवून त्यानंतरच त्यावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.
या नदी क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या पालक, वांगे, कोबी भाजीपाल्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा रंग गर्द हिरवा दिसतो, असे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले.
शोष खड्डे व शौचालयासाठी बांधण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे पाणी प्रदूषणाबाबत विचारण्यात आले असता, या क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याबाबत तपास करुन अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे बैठकीत चर्चेदरम्यान सांगण्यात आले. सांडपाण्यात झाडे लावल्यास पाण्यातील घाण झाडात अडून पाणी शुध्दीकरणास मदत होते तसेच पाणी मिळाल्यामुळे झाडांची वाढ होते असे त्यांनी सांगितले. सांडपाण्यात जाळी लावून पाणी शुध्दीकरण करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.