किडनी प्रत्यारोपणासाठी आरएमओ उधारीवर

By admin | Published: February 24, 2016 03:16 AM2016-02-24T03:16:12+5:302016-02-24T03:16:12+5:30

किडनी प्रत्यारोपण केंद्र चालविण्यासाठी बधिरीकरण (अ‍ॅनेस्थेशिया), औषध वैद्यक (मेडिसीन) व शल्यक्रिया विभागाच्या ...

RMO lending for kidney transplant | किडनी प्रत्यारोपणासाठी आरएमओ उधारीवर

किडनी प्रत्यारोपणासाठी आरएमओ उधारीवर

Next

सुपर स्पेशालिटी रुग्णालय : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३९१ पदे रिक्त
नागपूर : किडनी प्रत्यारोपण केंद्र चालविण्यासाठी बधिरीकरण (अ‍ॅनेस्थेशिया), औषध वैद्यक (मेडिसीन) व शल्यक्रिया विभागाच्या (सर्जरी) एक वर्षांचा अनुभव असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याची (आरएमओ) गरज असते. तज्ज्ञाच्या मते, या सर्व विभागाचे प्रत्येकी तीन-तीन आरएमओ मिळाले तर प्रत्यारोपणला मदत होऊन उपचारात गती येऊ शकते. परंतु राज्यातील पहिले किडनी प्रत्यारोपण शासकीय रुग्णालय असलेल्या सुपर स्पेशालिटीमध्ये होऊनही वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालकाने (डीएमईआर) अद्यापही आरएमओची पदे भरलेली नाही. यामुळे येत्या सोमवारी होणाऱ्या प्रत्यारोपणासाठी मेडिकलकडून पुन्हा उधारीवर आरएमओ मागितले जाणार आहे.
रुग्णालयाचा ‘कणा’ असलेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा सुपर स्पेशालिटीमध्ये भरलेल्याच नाहीत. यामुळे रुग्ण सेवांचा बोजवारा उडाला आहे. या हॉस्पिटल्समध्ये आरएमओंची सुमारे ३९१ पदे रिक्त आहेत. हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर निघून गेल्यानंतर रुग्णाची जबाबदारी परिचारिकांवर येते. येत्या सोमवारी होणाऱ्या दुसऱ्या किडनी प्रत्यारोपणामुळे निवासी डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
‘सुपर’मध्ये हृदय शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, यूरोसर्जरी या सात विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. गेल्या दोन वर्षात २५ हजार ९७६ रुग्णाची वाढ झाली आहे. तसेच आंतररुग्णांतही वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ५ हजार ५१२ रुग्ण भरती होते. गेल्या वर्षी १ हजार ५५१ रुग्णांची वाढ होऊन ही संख्या ७ हजार ६३ वर गेली आहे. रुग्णालयात रोज १५ वर अ‍ॅन्जिओग्राफी, ५ वर अ‍ॅन्जिओप्लास्टी, दोन हृदयशल्यक्रियासह दोन न्यूरो सर्जरी होतात. या शिवाय बहुसंख्य वॉर्डाच्या खाटा गंभीर रुग्णाने फुल्ल असतात. यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी २४ तास डॉक्टरांची गरज असते. परंतु सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेनंतर डॉक्टरच राहत नसल्याने अनेकवेळा रुग्णाच्या जीवावर बेतते. अशी बिकट स्थिती असतानाही शासनाचे याकडे लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: RMO lending for kidney transplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.