नागपुरात रस्ते अपघाताला आळा : गतवर्षीच्या तुलनेत अपघात कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:06 PM2019-09-10T22:06:29+5:302019-09-10T22:08:11+5:30
रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या कमी झाल्याने मृत्यूसंख्या कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या कमी झाल्याने मृत्यूसंख्या कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.
बेशिस्त वाहतूक व्यवस्थेमुळे गेल्या वर्षी अपघाताची संख्या वाढली होती. वारंवार अपघात घडत होते. ८ सप्टेंबर २०१८ पर्यंत उपराजधानीत १७८ जीवघेणे अपघात घडले होते. एकूण अपघाताची संख्या ६०९ होती. यावर्षी सप्टेंबर महिन्यांपर्यंत ५६१ अपघात झाले आणि मृत्यूसंख्या १६२ आहे.
शहरातील काही मार्गांवर वारंवार अपघात घडतात. अशी एकूण ८३ ठिकाणे अधोरेखित करून वाहतूक पोलिसांनी त्यातील ४० ठिकाणांना ब्लॅक स्पॉट तर ४३ ठिकाणांना हॉट स्पॉट ठरवले. या सर्व ठिकाणी पुन्हा अपघात घडणार नाही, यासाठी ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या केल्या.
काय आहे हॉट आणि ब्लॅक स्पॉट
ज्या ठिकाणी गंभीर अपघात घडतात त्या ठिकाणांना हॉट आणि ज्या ठिकाणी जीवघेणे अपघात घडले त्याला ब्लॅक स्पॉट ठरवत वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा दलाच्या मदतीने वाहनचालकांना रस्त्यारस्त्यावर वाहतुकीचे धडे दिले. त्याचाच परिणाम म्हणून १६२ अपघात कमी झाले.
आयुक्तांच्या संकल्पाला प्रयत्नांची जोड
नागपूरला अपघातमुक्त शहर बनविण्याचा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संकल्प केला होता. अपघात रोखण्यासाठी जनजागरण, रॅली तसेच शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी वाहतूक शाखेची धुरा हातात घेतल्यानंतर बेशिस्त वाहतुकीला वळणावर आणण्याचे प्रयत्न चालविले. त्याचाही चांगला परिणाम उपरोक्त आकडेवारीतून दिसून येत आहे.