हाही बंद, तोही बंद, सांगा आता जायचे कुठून?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 02:23 PM2023-09-27T14:23:58+5:302023-09-27T14:25:10+5:30
विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचून वर्ष लोटले, आता पंचशीलही पूल खचला
नागपूर : शहराचे हृदयस्थळ असलेला सीताबर्डी, रामदासपेठ या परिसरातील नागनदीवरील पुलांमुळे वाहतुकीला फटका बसत आहे. विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचून वर्ष लोटले. पण, अजूनही त्याचे बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे रामदासपेठ व कॅनॉल रोडवरील वाहतूक अनेक महिन्यांपासून बंद आहे.
शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने पंचशील चौकातील पूल खचल्यामुळे झाशीची राणी चौक ते पंचशील चौकादरम्यानचा रस्ताही बंद आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला असून, रामदासपेठेतील गल्लीबोळीत वाहतुकीचा ताण वाढला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये विद्यापीठ लायब्ररीजवळील पूल खचला होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये मे. सनी इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीला १२ महिन्यात पूल पूर्ण करून देण्यासाठी ८,०३,५३,५६४ रुपयांचे कंत्राट दिले होते.
लोकमतच्या पथकाने प्रत्यक्ष जाऊन पुलाच्या बांधकामाचा आढावा घेतला असता लक्षात आले की, अजूनही ५० टक्केपेक्षा जास्त काम शिल्लक आहे. या पुलाच्या बांधकामामुळे रामदासपेठेतून महाराजबागकडे जाणारी वाहतूक गल्लीबोळीतून वळविली आहे. पंचशील चौकाकडून सेंट्रल मॉलकडे जाणाऱ्या कॅनॉल रोडवरची वाहतूकही बंद केली आहे. त्यामुळे वाहतुकीचा लोंढा रामदासपेठेतून वळविण्यात आला आहे. रामदासपेठवासीयांना वाढत्या वाहतुकीचा त्रास असहाय्य झाला आहे. त्यातच रामदासपेठेतील रस्तेही खराब आहेत. मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहेत. वर्षभरापासून वाहनचालक व रामदासपेठवासीयांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
उड्डाणपूल एकमेव पर्याय
वर्धा रोडवरून येणाऱ्या वाहनांना सीताबर्डीत जाण्यासाठी उड्डाणपूल हा एकमेव पर्याय आहे. अन्यथा धंतोली पोलिस स्टेशन मार्गाने आनंद टॉकीज होत सीताबर्डीत जावे लागत आहे. बांधकामासाठी रस्ते ब्लॉक केल्याने धंतोली, रामदासपेठ, सीताबर्डी भागात वाहतूक प्रचंड वाढली आहे.
वाहनचालकांच्या खिशाला भुर्दंड
विद्यापीठ ग्रंथालयाजवळील पुलाचे काम संथगतीने सुरु असल्याने आणि पंचशीलजवळील पूल खचल्याने नागरिकांना फेरा मारून जावे लागत आहे. अतिरिक्त पेट्रोलच्या खर्चामुळे नागरिकांच्या खिशावर भुर्दंड पडत आहे. सिव्हिल लाइन्स परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांसाठी हे दोन्ही रस्ते सहज व सोपा होते. आता ये-जा करताना किमान १ किमीचा फेरा मारावा लागत आहे.
रामदासपेठेतील पूल बांधण्यास वर्ष लागू शकते
येत्या दिवाळीपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, कामाची स्थिती बघता, या पुलाच्या पूर्णत्त्वास वर्ष लागू शकते. आता दुसराही पूल खचल्याने तो आणखी किती वर्षे घेईल, असा सवाल नागपूरकरांचा आहे.