वर्धा मार्गावर मेट्रोमुळे वाहतुकीची कोंडी
By Admin | Published: October 30, 2016 02:46 AM2016-10-30T02:46:44+5:302016-10-30T02:46:44+5:30
वर्धा मार्गावर मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून
नागरिक त्रस्त : अधिकारी झोपेत, रोजच उद््भवते स्थिती
नागपूर : वर्धा मार्गावर मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे मार्ग अरुंद झाला आहे. या मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून यावर तोडगा काढून वाहतूक सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी आहे. गुरुवार आणि शुक्रवारी रात्री नागपूर विमानतळासमोर वर्धा मार्गावर जवळपास अडीच तास वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे शेकडो वाहने गर्दीत अडकली. सोबतच दोन अॅम्ब्युलन्स गर्दीत फसल्या. गर्दी दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुणीही मेट्रोचे अधिकारी व कर्मचारी आणि वाहतूक पोलीस उपस्थित नव्हते. (प्रतिनिधी)
वाहनचालक निरुत्तर
रात्री कोंडीत फसलेले लोक त्रस्त होते. कोंडी का झाली आणि केव्हा दूर होईल, यावर लोक निरुत्तर होते. सदर प्रतिनिधी कोंडीत फसला होता. लोकांनी सांगितले की, गेल्या ३५ मिनिटांपासून वाहने जागीच उभी आहेत. काही मिनिटानंतर विचारपूस केली असता चिंचभुवनकडून येणाऱ्या मार्गावर एका बाजूला मोठी ट्रॉली फसल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असून त्यामुळे चिंचभुवनकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आल्याचे कामगारांनी सांगितले.
काही वेळानंतर कोंडीत फसलेल्या काही युवकांनी साईट अधिकारी वा अभियंता कुठे आहे, अशी विचारपूस केली. बराच वेळ शोध न लागल्याने युवकांनी स्वत: शोधमोहीम सुरू केली. कोंडी सोडवून अन्य मार्गाने वाहतूक सुरू करण्यासाठी युवकांनी प्रयत्न केला. शोधमोहिमेनंतरही अधिकारी वा अभियंता सापडला नाही. अधिकारी झोपले असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
सदर प्रतिनिधीने साईट अभियंत्याचा मोबाईल क्रमांक विचारला, पण कुणीही दिला नाही. क्रमांक माहीत नसल्याचे सर्वांनी उत्तर दिले. वाहतुकीची कोंडी झाल्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी कुठल्याही कर्मचाऱ्याकडे वॉकीटॉकी नव्हती. प्रतिनिधीने अधिकाऱ्याला मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला, पण अधिकाऱ्याचा मोबाईल बंद होता. त्या अधिकाऱ्याला एसएमएससुद्धा केला, पण दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या अधिकाऱ्याकडून कुठलाही मॅसेज आला नाही वा कोंडी का झाली, याची माहिती मेट्रो रेल्वेतर्फे देण्यात आली नाही.
वर्धा मार्गावर होणारी कोंडी नेहमीच
वर्धा मार्गावर दररोजच वाहतुकीची कोंडी होते. मेट्रो रेल्वे कामावरील मोठ्या मशीन्स मार्गाच्या मध्यभागी उभ्या करण्यात येत असल्यामुळे वाहतूक जाम होते. अशा स्थितीत वाहतुकीच्या सुरळीत संचालनासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना या ठिकाणी तैनात केले पाहिजे. कोंडी कुठपर्यंत झाली आहे आणि ती कशी सोडविता येईल, यासाठी त्यांच्याकडे वॉकीटॉकी असली पाहिजे. पण याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. रात्री मेट्रो रेल्वे अधिकारी या ठिकाणी तैनात असला पाहिजे. पण याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले.
त्रासाबद्दल खेद
यासंदर्भात नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे उपमहाव्यवस्थापक (समन्वय व जनसंपर्क) शिरीष आपटे यांनी वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला. मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे नागपूरकरांना कुठलीही असुविधा होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले.