नागपुरात मद्याची ‘होम’ऐवजी ‘रोड डिलिव्हरी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 09:07 PM2020-08-01T21:07:29+5:302020-08-01T21:10:01+5:30
राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने मद्याच्या दुकानांमध्ये थेट विक्रीऐवजी होम डिलिव्हरीला मान्यता दिली आहे. याअंतर्गत परवानाधारकांना विक्री क रण्याची मुभा देण्यात आली आहे. पण नागपुरातील सर्वच मद्य दुकानांमध्ये होमऐवजी रोड डिलिव्हरी सर्रास सुरू असल्याची बाब दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने मद्याच्या दुकानांमध्ये थेट विक्रीऐवजी होम डिलिव्हरीला मान्यता दिली आहे. याअंतर्गत परवानाधारकांना विक्री क रण्याची मुभा देण्यात आली आहे. पण नागपुरातील सर्वच मद्य दुकानांमध्ये होमऐवजी रोड डिलिव्हरी सर्रास सुरू असल्याची बाब दिसून येत आहे. याकडे अबकारी विभागाचे दुर्लक्ष असल्याने दुकानदारांचे फावत आहे.
अनलॉकमध्ये ४ जूनपासून प्रशासनाने मद्य व बीअरची होम डिलिव्हरी विक्रीची सेवा सुरू केली. ग्राहकाने संबंधित दुकानात फोन केल्यानंतर वाहतुकीचे काही शुुल्क आकारून परवानाधारकाला घरपोच सेवा देण्यात येत आहे. पण ग्राहक दुकानातच जास्त येत असल्याने दुकानदारांनीही विविध क्लृप्त्या अवलंबून ग्राहकाला दुकानाबाहेरच काही अंतरावर मद्य पोहोचविणे सुरू केले. त्यामुळे दुकानाच्या सभोवताल राहणाऱ्यांना त्रास होऊ लागला. या संदर्भात अनेक तक्रारी अबकारी विभागाकडे येऊ लागल्या. पण आतापर्यंत कारवाई शून्यच आहे. आर्थिक व्यवहारामुळे अधिकारी काहीच कारवाई करीत नसल्याने दुकानदार बेधडक मद्याची विक्री करू लागले आहेत. काही बारमध्ये खुल्या जागेत मद्यपींना पिण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे.
सदर प्रतिनिधीने नंदनवन, सक्करदरा आणि सीताबर्डी, सुरेंद्रनगरातील मद्याच्या दुकानाची पाहणी केली केली. पाहणीत अनेक बाबी पुढे आल्या आहेत. नंदनवन, जगनाडे चौकाच्या बाजूकडील मद्याच्या दुकानाच्या आडोशाला मद्य ग्राहकाला आणून देणारे अनेकजण उभे असतात. त्यांना मद्याचे पैसे आणि १० रुपये अतिरिक्त दिल्यास ते दुकानात जाऊन मद्य ग्राहकाला पोहोचते करून देतात. याकरिता दुकानदार ग्राहकाला परवाना आहे की नाही, याची विचारणा करीत नाहीत. याआधारे दुकानदार नियमितरीत्या विक्री करीत असल्याचे दिसून आले. याशिवाय नंदनवन भागातील बीअर शॉपी, सक्करदरा आणि सीताबर्डी भागातील मद्याच्या दुकानात अशाच प्रकारे विक्री सुरू आहे. अशा विक्रीवर कोण प्रतिबंध आणणार, हा गंभीर प्रश्न आहे. याकरिता अधिकाऱ्यांना विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.
कारवाईचे क्षेत्रीय निरीक्षकांना आदेश
ग्राहकाला दुकानाबाहेर मद्याची विक्री करणाऱ्याऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश क्षेत्रीय निरीक्षकाला दिले आहेत. आतापर्यंत कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. पण पुढे तपासणी आणि कारवाई सुरूच राहणार आहे.
-प्रमोद सोनोने, जिल्हा अधीक्षक, अबकारी विभाग.