काटोल-नरखेड तालुक्यातील रस्ते प्रकल्पांना गती मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:08 AM2021-02-27T04:08:25+5:302021-02-27T04:08:25+5:30
नागपूर : काटोल आणि नरखेड तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक ...
नागपूर : काटोल आणि नरखेड तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक झाली. अभासी माध्यमाद्वारे झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, मंत्रालयातून रस्ते सचिव उल्लास देबडवार, सचिव अनिल गायकवाड, एडीबीचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोले आणि बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. काटोल, नरखेड तालुक्यातील रस्ते बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी बैठकीदरम्यान दिली.
या बैठकीत काटोल व नरखेड तालुक्यासह बाजारगाव सर्कल मधील खराब झालेल्या रस्त्यांची माहिती घेऊन त्यांवर निधी देण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली. तसेच २०२०-२०२१ मध्ये जवळपास ६० कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले. त्यांची सध्या स्थिती जाणून घेण्यात आली. मागील अर्थसंकल्पात तब्बल ४० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या काळात निधी नसल्याने ती कामे सुध्दा थांबली होती. याबाबत लवकरच निविदा काढून ती सर्व कामे लवकर सुरु करण्याचे आदेश या बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आले. काटोल व नरखेड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या प्रकल्पांसाठी किती निधीची आवश्यकता आहे याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेत ती सर्व कामांसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्याचे आश्वासन यावेळी चव्हाण यांनी देशमुख यांना दिले.