रोड, रेल्वे अन् मेट्रो...सर्वच ठिकाणी राहणार पंतप्रधानांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 07:57 PM2022-12-07T19:57:55+5:302022-12-07T19:58:41+5:30
Nagpur News ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यात रेल्वेस्थानक, समृद्धी महामार्ग आणि मेट्रोचे उद्गाटन करणार असल्याची शक्यता आहे.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दि. ११ डिसेंबर रोजीच्या नागपूर दौऱ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अजून नेमका कार्यक्रम आला नसला तरी पंतप्रधान केवळ विमानतळ व मिहान परिसरात जाणार नाहीत. सुरक्षायंत्रणांना मिळालेल्या संभावित नियोजनानुसार ते रस्तेमार्गाने थेट शहराच्या मध्यभागी असलेल्या मेट्रोच्या फ्रीडम पार्कला भेट देऊ शकतात. याशिवाय रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखविण्याची योजना तयार करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. तसेच त्याच दिवशी नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसलादेखील हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे, तर कामठी मार्ग व सेंट्रल एव्हेन्यू या दोन्ही मार्गांवरील मेट्रो मार्गाचेदेखील उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मिहान परिसरातूनच हे सर्व लोकार्पण करण्याच्या दृष्टीने अगोदर हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र सुरक्षायंत्रणेला आलेल्या सूचनांनुसार आता नियोजनात बदल झाला आहे. पंतप्रधान हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर तेथून रस्तेमार्गाने थेट नागपूर रेल्वेस्थानकावर जातील. तेथे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील वर्तमानपत्रांच्या स्टॉलजवळून ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवतील. त्यानंतर ते झिरो माइल मेट्रो स्थानकावर जातील व फ्रीडम पार्कची पाहणी करतील. तेथूनच ते दोन मार्गांचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. यानंतर ते मेट्रोने थेट खापरी मेट्रो स्थानकावर पोहोचतील.
‘समृद्धी’ची स्वतः करणार पाहणी
पंतप्रधान समृद्धी महामार्गावर जाणार नाहीत, अशी चर्चा होती. मात्र सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी समृद्धी महामार्गावर जातील. तेथील ‘झिरो माइल’ची पाहणी केल्यानंतर ते मिहान परिसरातील कार्यक्रमस्थळी येतील. तेथे अधिकृत लोकार्पण होईल. भाषणानंतर ते विमानतळाकडे रवाना होतील. त्यांचा नागपूरचा दौरा हा १ तास ४७ मिनिटांचा असण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात एकही वरिष्ठ अधिकारी अधिकृतरीत्या भाष्य करण्यास तयार नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून नेमका तपशील येण्याचीच प्रतीक्षा करण्यात येत आहे.
सुरक्षा यंत्रणांची परीक्षाच
रविवारचा दिवस असला तरी सीताबर्डी, रेल्वेस्थानक परिसरात चांगलीच वर्दळ असते. पंतप्रधान देशाच्या केंद्रस्थानी पोहोचणार आहेत. रस्ते, मेट्रो मार्गाने प्रवास करण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या सुरक्षेचेदेखील कडे राहणार आहे. नागपुरात विविध भागांत साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. शहरातील विविध भागांत पोलीस तैनात राहणार आहेत. १ तास ४७ मिनिटांचा दौरा लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांची परीक्षाच राहणार आहे.
समन्वयाने बंदोबस्ताचे नियोजन
सुरक्षेसाठी आवश्यक नियोजन झाले आहे. वाहतूक व्यवस्थेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याचीदेखील खबरदारी घेण्यात येत आहे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत शहरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनदेखील संपूर्ण लक्ष ठेवण्यात येणार आहे. राज्य, केंद्र व शहर पोलिसांच्या यंत्रणेच्या समन्वयातून सुरक्षेचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.