रेल्वे काऊंटरवरच्या रांगांभोवती समाजकंटकांची घुटमळ; प्रवाशांची गर्दी, महिला वृद्ध, दिव्यांगांना मनस्ताप
By नरेश डोंगरे | Published: August 24, 2023 01:51 PM2023-08-24T13:51:58+5:302023-08-24T13:55:53+5:30
एकच काउंटर : सुरक्षेसाठी येथे पोलीस किंवा आरपीएफचे जवान दिसत नाहीत
नरेश डोंगरे
नागपूर : रेल्वे तिकिटांच्या बुकिंगचे एकच काऊंटर सुरू असल्याने काउंटरवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी पाहून समाजकंटकही तेथे घुटमळू लागले आहेत. परिणामी वृद्ध, महिला आणि दिव्यांगांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे अनुचित घटना होण्याचाही धोका आहे.
येथील मुख्य रेल्वे स्थानकाच्या मुख्य पश्चिम द्वारावर चार तर संत्रा मार्केटकडच्या पूर्व द्वारावर दोन तिकिट काउंटर आहे. या सहा पैकी तीन काउंटर शिफ्टमध्ये सुरू असतात. तर तीन नेहमीसाठी सुरू असतात. संत्रा मार्केटकडच्या दोन काऊंटर पैकी एकच काऊंटर (शिफ्ट मधीळ) गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे तिकिट काढणाऱ्या प्रवाशांची या काउंटरवर मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात सुरक्षेसाठी येथे पोलीस किंवा आरपीएफचे जवान दिसत नाहीत. त्यामुळे महिला प्रवाशांची गर्दी झाल्याचे पाहून चोर-भामटे, समाजकंटक आणि मजनूगिरी करणारेही येथे घुटमळत असल्याच्या तक्रारी आहेत.
या संबंधाने भारतीय यात्री केंद्राकडे प्रवाशांच्या अनेक तक्रारी आल्याचे पाहून यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे आणि अन्य वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. वृद्ध,आजारी आणि दिव्यांगांची एकाच काउंटरवर गर्दी दिसत असल्याने आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ किंवा रेल्वे पोलीस दिसत नसल्याने अनुचित प्रकार घडण्याची भिती या तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. अनेक प्रवासी तिकीट न काढताच परत जात असल्याचे सांगून शुक्ला यांनी रेल्वेचे बंद तिकिट काउंटर सुरू करावे, अशी विनंतीही अधिकाऱ्यांना या तक्रार वजा निवेदनातून केली आहे.
अधिकारी म्हणतात...
या संबंधाने रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता तिकिट काउंटर सुरू असून, प्रवाशांना त्रास होत असेल तर योग्य व्यवस्था करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.