बंगालमध्ये रोड शो, रॅलीला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:07 AM2021-04-24T04:07:47+5:302021-04-24T04:07:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून, निवडणुकीचे अद्याप दोन टप्पे शिल्लक आहेत. कोरोनाचे संकट ...

Road shows, rallies banned in Bengal | बंगालमध्ये रोड शो, रॅलीला बंदी

बंगालमध्ये रोड शो, रॅलीला बंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून, निवडणुकीचे अद्याप दोन टप्पे शिल्लक आहेत. कोरोनाचे संकट कायम असतानादेखील सुरू असलेल्या राजकीय रॅलींवरून उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर निवडणूक आयोगाने रोड शो तसेच कुठल्याही प्रकारच्या रॅलीवर बंदी घातली आहे. तसेच प्रचारसभांमध्ये ५०० लोकांची उपस्थिती मर्यादा लावली आहे. जर अगोदर कुठल्या आयोजनाला परवानगी दिली असेल, तर त्यादेखील रद्द करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

गुरुवारी उच्च न्यायालयाने आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. केवळ नोटीस जारी करून आयोगाची जबाबदारी संपत नाही. टी.एन. शेषन यांच्याप्रमाणे अधिकारांचा उपयोग केला असता, तर पश्चिम बंगालमध्ये संसर्ग वाढीस लागला नसता, असे न्यायालयाने सुनावले होते. त्यानंतर, आयोगाने नवीन निर्देश जारी केले. प्रचारसभांमध्ये कुठलीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच रोड शो व रॅली रद्द करण्यात येत आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.

भाजपची भूमिका, रॅलीमुळे कोरोनावाढ नाही

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, बंगालमध्ये निवडणूक रॅलीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रॅलीमुळे कोरोना वाढत नाही. बंगाल दहा राज्यांमध्ये आठव्या स्थानी आहे. जर प्रचारामुळे कोरोना पसरला असता, तर संख्या आणखी जास्त असती. महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगडमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. तेथे निवडणूक रॅली आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान, ममता यांच्या सभा रद्द; तृणमूलकडून नियमभंग

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री व तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी प्रचारसभा रद्द केल्या आहेत. भाजपने सर्व मोठ्या सभा रद्द केल्या आहेत. दुसरीकडे दुर्गापूर पश्चिम विधानसभा मतदारसंघासह विविध ठिकाणी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बाइक रॅली काढून पहिल्याच दिवशी नियमांचा भंग केला.

Web Title: Road shows, rallies banned in Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.