दोन वर्षापासून प्रभागातील रस्त्यांची कामे ठप्प ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:49+5:302021-06-29T04:06:49+5:30
निधीअभावी प्रभाग ३० मधील रखडला विकास : जुना सक्करदरा, बिडीपेठ, अयोध्यानगर परिसरातील रस्त्यावर खड्डे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
निधीअभावी प्रभाग ३० मधील रखडला विकास : जुना सक्करदरा, बिडीपेठ, अयोध्यानगर परिसरातील रस्त्यावर खड्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग ३० मधील अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा यासह अन्य वस्त्यातील रस्त्यांची कामे दोन वर्षांपासून ठप्प आहेत. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारी करूनही समस्या मार्गी लागत नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
रस्त्यांवरील गिट्टी बाहेर निघाली असून खड्डे पडले आहेत. नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता, प्रभागातील रस्त्यांची कामे मंजूर करून घेतली. काही कामांचे कार्यादेशही झाले आहेत. मात्र वर्षभरापूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण पुढे करीत, कार्यादेश झालेली कामे थांबविली. आता पावसाळा सुरू होताच खड्ड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी सांगितले.
नगरसेवकांना प्रभागातील विकास कामे करता यावीत, यासाठी अर्थसंकल्पात वर्षाला २० लाखांच्या निधीची तरतूद केली जाते. तरतुदीनुसार फाईल तयार केल्या आहेत. परंतु निधी नसल्याचे कारण पुढे करण्यात आल्याने दोन वर्षात वॉर्ड निधीतील विकास कामे झालेली नाही. अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा परिसरातील रस्त्यांवर कायम वर्दळ असते. रस्त्यावरील गिट्टी बाहेर पडल्याने वाहनामुळे धूळ उडत असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. प्रमुख रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्तेही नादुरुस्त आहेत. यामुळे लहान मुलांना सायकल चालविताना वा खेळताना गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
....
विहिरींचे पाणी दूषित
ताजबाग, जुना सुभेदार, अयोध्यानगर, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार ले-आऊट, बिडीपेठ, जुना सक्करदरा आदी भागातील गडरलाईन जुन्या झाल्या आहेत. ठिकठिकाणी लिकेज असल्याने दूषित पाणी जमिनीत मुरते. यामुळे घराघरातील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. या पाण्याचा वापर करता येत नाही. यामुळे नळाच्या पाण्याचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. वास्तविक विहिरीच्या पाण्याचा वापर केल्यास मनपाच्या पाणीपुरवठा यंत्रणेवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
....
जागोजागी चेंबर नादुरुस्त
गडरलाईनवरील चेंबर ठिकठिकाणी नादुरुस्त झाले आहेत. जोराचा पाऊस आला की गडरलाईनमधील घाण पाणी तुटलेल्या चेंबरमधून रस्त्यावर वाहते. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.