ओबीसीचे राजकीय भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास रास्ता रोको आणि निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:27 PM2021-07-12T16:27:07+5:302021-07-12T16:27:37+5:30
ओबीसींचे राजकीय भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात रस्ता रोको आणि निदर्शने करण्यात येतील, असा इशारा नागपुरात सोमवारी झालेल्या ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओबीसींच्या आरक्षित जागा जागा खुल्या प्रवर्गातून भरणे हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. ओबीसींचे राजकीय भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात रस्ता रोको आणि निदर्शने करण्यात येतील, असा इशारा नागपुरात सोमवारी झालेल्या ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत देण्यात आला.
सक्करदरा येथील सेवादल महिला महाविद्यालयाच्या सभागृहात ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आरक्षण बचाव परिषद झाली. यावेळी आ. ऍड. अभिजित वंजारी, ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे, माजी पोलिस उपायुक्त ऍड. धनराज वंजारी, ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष जे.डी. तांडेल, विलास काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या आरक्षण बचाव परिषदेमध्ये 13 ठराव पारित करण्यात आले. ओबीसींचे आरक्षण हा हक्क आहे, तो कुणीही अडवू शकत नाही. त्यासाठी सर्वांनी एकसंघ व्हावे आणि सर्व मातृसंघटनांनी एकत्रित येऊन लढा पुकारावा, असे आवाहन या बचाव परिषदेत वक्त्यांनी केले.