वर्ष उलटूनही तयार झाले नाहीत रस्ते

By admin | Published: December 30, 2016 02:29 AM2016-12-30T02:29:32+5:302016-12-30T02:29:32+5:30

उपराजधानीत ३२ सिमेंटचे रस्ते तयार करण्यासाठी वाहतूक विभागाला परवानगी मागण्यात आली आहे.

Roads were not created even after the reverse | वर्ष उलटूनही तयार झाले नाहीत रस्ते

वर्ष उलटूनही तयार झाले नाहीत रस्ते

Next

समस्या वाढल्या : वाहतूक विभागाला मागितली परवानगी
योगेंद्र शंभरकर   नागपूर
उपराजधानीत ३२ सिमेंटचे रस्ते तयार करण्यासाठी वाहतूक विभागाला परवानगी मागण्यात आली आहे. काही रस्त्यांची परवानगी मिळून वर्षभरापूर्वी काम सुरू होऊनही रस्ते तयार झालेले नाहीत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. एकेरी रस्त्यावरून वाहतूक होत असल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत आहे.
शहरातील काही रस्ते असे आहेत की ज्याची परवानगी मिळूनही त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. परंतु या रस्त्याच्या कामासाठी वाहतूक विभागाला नोटीस काढून संबंधित रस्ता वाहतुकीसाठी बंद करून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळविल्याची सूचना काढावी लागते. त्यापूर्वी वृत्तपत्रात नोटीस देऊन नागरिकांकडून आक्षेप मागविण्यात येतात. नागरिकांचा आक्षेप नसल्यास महिनाभरात शहर सहपोलीस आयुक्त सूचना काढतात. मात्र ही परवानगी वाहतूक विभागातर्फे ठरविण्यात आलेल्या नियम व अटींच्या आधारे देण्यात येते. तरीसुद्धा रस्ते तयार करताना नियमांकडे दुर्लक्ष करण्यात येते. पूर्व नागपूर वाहतूक विभागाकडून गजानननगर चौक ते उदयनगर चौक, वाठोडा चौक ते संघर्षनगर चौक, रामेश्वरी चौक ते आंबेडकर चौक, गुरुदेवनगर चौक ते ईश्वरनगर चौक, छोटा ताजाबाद टी पॉईंट ते भांडेप्लॉट चौक, भांडेप्लॉट चौक ते गुरुदेवनगर चौक, ईश्वरनगर ते ज्योती हायस्कूल आणि येथून दिघोरी उड्डाण पुलापर्यत, तिरंगा चौक ते सक्करदरा चौक आणि विदर्भ प्रीमिअर बिल्डींग ते हुसैन बाबा दरगाहपर्यंत परवानगी मागण्यात आली आहे. इंदोरा वाहतूक विभागाकडून आॅटोमोटिव्ह चौक ते कपिलनगर चौक, कपिलनगर चौक ते पॉवरग्रीड चौक आणि पुढे जरीपटका उड्डाण पुलापर्यंत, १० नंबर पुल ते इंदोरा चौक आणि पुढे कमाल चौक, वैशालीनगर एनआयटी कार्यालय ते गमदूर हॉटेल (कामठी रोड) तसेच कळमना मार्केट ते भरतनगर (उड्डाणपुल) पर्यंत परवानगी मिळाली आहे. एमआयडीसी विभागाकडून मंगलमूर्ती चौक ते त्रिमूर्ती चौक, खामला चौक ते त्रिमूर्ती चौक, मंगलमूर्ती चौक ते शितला माता मंदिर सुभाषनगरपर्यंत आणि आयटी पार्क ते संभाजीनगर चौकापर्यंत परवानगी मिळाली आहे. उत्तर विभागाकडून लकडगंजच्या काबरा पेट्रोल पंप टी पॉईंट ते बरबटे चौक, नाका नंबर १३ ते मौलाना नातिक चौक, जुना बगडगंज (हरीहरनगर टी पॉईंट) ते छापरुनगर (भंडारा रोड), जुना बगडगंज कुंभारटोली ते छापरुनगर चौक, सुनील हॉटेल ते टेलिफोन एक्स्चेंज चौकापर्यंत परवानगी मिळाली आहे.
दक्षिण वाहतूक विभागाकडून अजनी रेल्वे उड्डाणपूल ते अजनी चौक, माता कचेरी चौक ते आरपीटीएस चौक, कृपलानी टर्निंग ते लक्ष्मीनगर चौक आणि अलंकार चौक ते बोले पेट्रोल पंप चौकापर्यंत रस्ता तयार करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. पश्चिम वाहतूक विभागाकडून लॉ कॉलेज चौक ते लेडीज क्लब चौक, पुष्पाताई तिडके जंक्शन ते एलएडी कॉलेज चौकापर्यंत परवानगी मागण्यात आली आहे. तर दक्षिण-पश्चिम वाहतूक विभागांतर्गत व्हीएनआयटी चौक ते लोकमत चौकापर्यंत रस्ता सिमेंटीकरणाच्या परवानगीनंतर अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अर्ज करताना लिहितात कालावधी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रस्ते तयार करणारी कंत्राटदार कंपनी मार्ग बंद करण्याची परवानगी मागण्यासाठी देण्यात आलेल्या अर्जावर रस्त्याचे काम पूर्ण होण्याचा कालावधी लिहितात. अनेकदा लहान मार्गाचे काम असल्यास तीन महिने आणि मोठ्या रस्त्यासाठी सहा महिने कालावधी मागण्यात येतो. परंतु कंत्राटदार कंपन्यांनी मागितलेल्या कालावधीत ते काम पूर्ण होत नसल्याचे पाहावयास मिळते.

दुर्लक्ष केल्यास करू शकतात काम बंद
वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय खांडेकर यांना शहरातील तयार करण्यात येणाऱ्या सिमेंटच्या रस्त्यांना उशीर होत असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कंत्राटदार कंपनीकडून रस्त्याच्या कामाच्या कालावधीबाबत शासकीय नोडल एजन्सी महानगरपालिका अटी ठरविते. वाहतूक विभागाला रस्ता बंद करण्यापूर्वी अर्ज केल्यानंतर नागरिकांचे आक्षेप मागविण्यात येतात. नागरिकांचा आक्षेप नसल्यास अधिसूचना काढण्यात येते. सोबतच बंद होणाऱ्या मार्गाला लागूनच पर्यायी रस्ता सुरू होण्याची सूचना काढण्यात येते. कंत्राटदाराने वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही, रस्ता वळविल्याचा बोर्ड लावण्याची ताकीद देण्यात येते. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास विभाग कंत्राटदाराचे काम बंद करू शकतो. सोबतच कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे अपघात झाल्यास गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद आहे.

 

Web Title: Roads were not created even after the reverse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.