एम्सच्या सफाई कर्मचाऱ्याला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:17+5:302021-03-06T04:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बेलतरोडी आणि सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूच्या धाकावर मारहाण करून दुचाकीस्वार लुटारूंनी दोघांना लुटले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेलतरोडी आणि सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकूच्या धाकावर मारहाण करून दुचाकीस्वार लुटारूंनी दोघांना लुटले. पीडितांपैकी एक एम्सचा सफाई कर्मचारी, तर दुसरा मिहानमधील एका कंपनीचा गार्ड आहे. २ मार्चच्या पहाटे या दोन्ही घटना घडल्या.
मूळ बांदा (उत्तर प्रदेश) मधील रहिवासी असलेला जितेंद्र बाबुलाल मलिक (वय ३५) हा सध्या खापरी पुनर्वसन परिसरात राहतो. तो एम्समध्ये सफाई कर्मचारी आहे. २ मार्चच्या मध्यरात्री तो कामावरून आपल्या घरी मोटारसायकलने परत जात होता. पेट्रोल संपल्याने तो दुचाकी ढकलत पायीच निघाला. तेवढ्यात पल्सरवर दोन भामटे आले. त्याला मदत करण्याच्या बहाण्याने पेट्रोल पंपावर नेले. त्याच्या दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर आरोपींनी त्याच्या गाडीचा ताबा घेतला. मलिकने त्यांना पेट्रोलचे पैसे घ्या आणि माझी गाडी मला परत द्या, असे म्हटले असता, आरोपींनी त्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. मलिकजवळचे ६ हजार रुपये, मोबाइल आणि मोटारसायकल हिसकावून आरोपी पळून गेला. भीतिपोटी त्या रात्री त्याने घरच्यांना ही माहिती दिली नाही. दुसऱ्या दिवशी तो दडपणाने बाहेर निघून गेला. गुरुवारी तो बेलतरोडी पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्या तक्रारीवरून ठाणेदार विजय आकोत यांनी लगेच पेट्रोलपंपावर जाऊन तेथून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
दरम्यान, अशीच दुसरी एक घटना २ मार्चच्या पहाटे मिहान खापरी भागातही घडली. एका कन्स्ट्रक्शन कंपनीत गार्ड असलेले सचिन मधुकर साखरे (वय ३५, रा. डोंगरगाव) हे कर्तव्यावर असताना मोटारसायकलवर दोन आरोपी आले. त्यांनी आरडाओरड करीत साखरेंना शिवीगाळ केली. ते पाहून पोलिसांना कळविण्यासाठी साखरेंनी मोबाइल बाहेर काढला असता, आरोपींनी त्यांना मारहाण करून मोबाइल हिसकावून नेला. साखरेंनी सोनेगाव ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविली. पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----
दोन्ही गुन्ह्यातील आरोपी एकच?
घटनास्थळ परिसर, वेळ आणि लुटारूंमधील साम्य बघता, या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी एकच असावे, असा संशय आहे. लवकरच या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
----